नागरी प्रश्नांवर माजी आमदार राजेश पाटील यांचा महापौरांकडे पाठपुरावा!

Share:

वालीव क्रीडा संकुल, पावसाळी पाण्याचा निचरा, विद्यार्थिनींचा प्रोत्साहन भत्ता आणि बससेवा विस्ताराच्या मागण्या; महापौर, उपमहापौरांसोबत विविध विषयांवर सविस्तर चर्चा

वसई-विरार : वसई-विरार शहर महानगरपालिका क्षेत्रातील प्रलंबित नागरी प्रश्न मार्गी लावून विकासकामांना गती मिळावी, यासाठी माजी आमदार राजेश रघुनाथ पाटील यांनी महापौर अजीवजी पाटील, उपमहापौर मार्शल लोपिस, प्रफुलजी साने आणि माजी महापौर नारायणजी मानकर यांची भेट घेऊन विविध महत्त्वपूर्ण विषयांवर सविस्तर चर्चा केली.

या भेटीदरम्यान शिरसाड गावातील पाणीपुरवठ्याचा प्रश्न प्राधान्याने मांडण्यात आला. तसेच वालीव येथील सर्व्हे क्रमांक ३३ मधील वनविभागाच्या जागेवर सुसज्ज क्रीडा संकुल उभारण्यासाठी संबंधित जागा महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्याची मागणी करण्यात आली.

गोखिवरे नाका ते सेलिब्रिटी हॉटेल आणि एव्हरशाईन गेट परिसरात पावसाळ्यात साचणाऱ्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी मोठ्या क्षमतेच्या मोऱ्यांची उभारणी करणे आणि गटारांची रुंदी वाढविण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.

महानगरपालिका क्षेत्रातील रहिवासी असूनही हद्दीबाहेरील शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना विशेष प्रोत्साहन भत्ता योजनेपासून वंचित राहावे लागू नये, यासाठी त्यांनाही या योजनेचा लाभ देण्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला.

याशिवाय शिरसाड नाक्यापासून चांदीप, कशीद कोपर आणि खराडतारा या भागांपर्यंत महानगरपालिकेची बससेवा विस्तारित करावी, तसेच ही सेवा सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवावी, अशी मागणी करण्यात आली. ग्रामीण भागातील नागरिक, विद्यार्थी आणि नोकरदारांच्या प्रवासाच्या दृष्टीने ही सुविधा महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.

या बैठकीला नगरसेविका ॲड. अस्मिता पाटील, नगरसेवक हर्षद चौधरी, समाजसेवक विशाल पाटील आणि धर्मेंद्र यादव उपस्थित होते.

नागरिकांच्या मूलभूत सुविधा, विद्यार्थिनींचे शैक्षणिक हित, पावसाळी पाण्याचा निचरा, क्रीडा सुविधांची उपलब्धता आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था या विषयांवर सकारात्मक कार्यवाही करण्याची आग्रही भूमिका माजी आमदार राजेश पाटील यांनी मांडली.

केवळ आश्वासनांपुरते प्रश्न मर्यादित न राहता प्रत्यक्षात विकासकामे मार्गी लागावीत, यासाठी राजेश पाटील यांचा पाठपुरावा महत्त्वपूर्ण ठरणार आहे. आता महानगरपालिका प्रशासन या मागण्यांवर किती लवकर कार्यवाही करते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

जनतेचा वाली

Share:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *