गरजू रुग्णांसह आपत्तीग्रस्तांना मदतीचा नवा आधार; मुख्यमंत्री सहायता निधीला मिळणार आर्थिक बळ
मुंबई | ३ नोव्हेंबर
राज्यातील दुष्काळग्रस्त, नैसर्गिक आपत्तीने बाधित नागरिक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना अधिक प्रभावीपणे मदत करता यावी, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून ‘महाराष्ट्र पब्लिक रिलीफ सोसायटी’ची स्थापना करण्यात आली आहे. कंपन्या, सामाजिक संस्था, देणगीदार आणि दानशूर व्यक्तींच्या सहभागातून अतिरिक्त निधी उभारून गरजूंपर्यंत मदतीचा हात पोहोचविण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे. या नव्या व्यवस्थेमुळे मुख्यमंत्री सहायता निधीला सामाजिक सहभागाचे आर्थिक बळ मिळणार आहे.
हृदयरोग, कर्करोग, मूत्रपिंडविकार, मेंदूविकार यांसारख्या गंभीर आजारांवरील शस्त्रक्रिया, महागडे उपचार आणि दीर्घकालीन वैद्यकीय सेवांसाठी गरजू रुग्णांना अधिक आर्थिक मदत उपलब्ध करून देण्याचा मार्ग या सोसायटीच्या माध्यमातून खुला होणार आहे. दुर्मिळ आजारांवरील उपचार, आवश्यक औषधे आणि वैद्यकीय साहित्य यांसाठीही मदत उभारता येणार आहे.
सामाजिक सहभागातून निधी उभारणी
मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाच्या आढावा बैठकीत गरजू रुग्णांच्या उपचारांसाठी सामाजिक दायित्वाच्या माध्यमातून अतिरिक्त निधी उभारण्याच्या पर्यायांचा अभ्यास करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. त्यानुसार महाराष्ट्र पब्लिक रिलीफ सोसायटीची स्थापना करण्यात आली.
या माध्यमातून कंपन्या, रुग्णालये, स्वयंसेवी संस्था आणि सामाजिक संस्थांना एकत्र आणून विविध वैद्यकीय मदत उपक्रम राबविण्यात येणार आहेत. सामाजिक सहभागातून उभारण्यात येणारा निधी गरजू रुग्णांच्या उपचारांसाठी तसेच आपत्तीग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी वापरता येणार आहे.
दुष्काळग्रस्तांसह दिव्यांग आणि गरजू नागरिकांनाही मदत
या सोसायटीच्या माध्यमातून नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबीयांना मदत करता येणार आहे. गरीब नागरिकांना आवश्यक वस्तूंचे वितरण, दिव्यांगांसाठी कार्यरत संस्थांना सहाय्य, सामुदायिक आरोग्य शिबिरांचे आयोजन आणि सार्वजनिक आरोग्याशी संबंधित उपक्रमांनाही आर्थिक मदत उपलब्ध करून देता येणार आहे.
आरोग्य जनजागृती, चर्चासत्रे, कार्यशाळा आणि विविध सामाजिक उपक्रमांनाही या माध्यमातून प्रोत्साहन मिळणार आहे. दुष्काळ, नैसर्गिक आपत्ती किंवा अन्य आपत्कालीन परिस्थितीत गरजेनुसार मदतीचे उपक्रम राबविण्याची व्यापक व्यवस्था या सोसायटीच्या माध्यमातून निर्माण होणार आहे.
लोकसहभागातून मदतीची व्याप्ती वाढणार
गरजू रुग्ण आणि आपत्तीग्रस्त नागरिकांपर्यंत अधिकाधिक मदत पोहोचविण्यासाठी सामाजिक सहभागातून संसाधने उभारणे हा महाराष्ट्र पब्लिक रिलीफ सोसायटीचा प्रमुख उद्देश आहे. कंपन्या, संस्था आणि दानशूर व्यक्तींच्या योगदानातून मदतीची व्याप्ती वाढविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
या उपक्रमासाठी दात्यांनी पुढे येऊन योगदान द्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी केले आहे.
जनतेचा वाली | जनहितासाठी निर्भीड पत्रकारिता
