पालघर जिल्ह्याची स्वच्छ व हरित विद्यालय मानांकनात उल्लेखनीय कामगिरी

Share:

३,१३७ शाळांचे स्वयंमूल्यांकन पूर्ण; ५ स्टार प्राप्त ११८ शाळांचे बाह्यमूल्यांकनही संपन्न

पालघर | ३ नोव्हेंबर २०२६

विद्यार्थ्यांना स्वच्छ, सुरक्षित, आरोग्यदायी आणि पर्यावरणपूरक शैक्षणिक वातावरण उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या ‘स्वच्छ व हरित विद्यालय मानांकन २०२६-२७’ उपक्रमात पालघर जिल्ह्याने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. जिल्ह्यातील तब्बल ३,१३७ शाळांचे स्वयंमूल्यांकन पूर्ण झाले असून, स्वयंमूल्यांकनात ५ स्टार मानांकन प्राप्त झालेल्या ११८ शाळांचे बाह्यमूल्यांकनही पूर्ण करण्यात आले आहे.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, शिक्षणाधिकारी प्राथमिक सोनाली मातेकर आणि शिक्षणाधिकारी माध्यमिक अशोक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. शाळांमधील स्वच्छताविषयक सुविधा, त्यांचा नियमित वापर, देखभाल आणि पर्यावरण संवर्धनासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची या माध्यमातून पडताळणी करण्यात आली.

३,१३७ शाळांचे स्वयंमूल्यांकन

जिल्ह्यातील शाळांनी केलेल्या स्वयंमूल्यांकनात विविध स्टार मानांकन प्राप्त शाळांचा समावेश आहे. त्यानुसार १ स्टार प्राप्त २०, २ स्टार प्राप्त १०८, ३ स्टार प्राप्त १,४९२, ४ स्टार प्राप्त १,३९९ आणि ५ स्टार प्राप्त ११८ शाळांचा समावेश आहे.

या मूल्यांकनातून शाळांनी स्वच्छता, आरोग्य आणि पर्यावरणपूरक सुविधांच्या उपलब्धतेबाबत स्वतःच्या कामगिरीचा आढावा घेतला. स्वयंमूल्यांकनात सर्वोच्च ५ स्टार मानांकन मिळविणाऱ्या ११८ शाळांची प्रत्यक्ष पडताळणी ३० ऑक्टोबर २०२६ रोजी पूर्ण करण्यात आली.

परीक्षकांना प्रशिक्षण; प्रत्यक्ष सुविधांची पडताळणी

बाह्यमूल्यांकनाची प्रक्रिया अचूक आणि एकसमान पद्धतीने पार पाडण्यासाठी २९ ऑक्टोबर रोजी परीक्षकांसाठी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. यामध्ये बाह्यमूल्यांकनाची कार्यपद्धती, शाळांमधील सुविधांची प्रत्यक्ष पाहणी आणि केंद्र सरकारच्या SHVR पोर्टलवर मूल्यांकनाची माहिती नोंदविण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

या प्रक्रियेत विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, विषय साधन व्यक्ती आणि समावेशित शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांनी परीक्षक म्हणून सहभाग घेतला. परीक्षकांनी संबंधित शाळांना भेटी देऊन स्वयंमूल्यांकनात नोंदविलेल्या माहितीची प्रत्यक्ष पडताळणी केली.

स्वच्छता, आरोग्य आणि पर्यावरण संवर्धनावर भर

बाह्यमूल्यांकनादरम्यान शाळांमधील सहा प्रमुख घटकांची तपासणी करण्यात आली. यामध्ये विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, स्वच्छतागृहांची स्वच्छता व वापरण्यायोग्य स्थिती, साबणाने हात धुण्याच्या सुविधा, पाणी व स्वच्छताविषयक सुविधांची नियमित देखभाल, स्वच्छता व आरोग्यविषयक वर्तन परिवर्तन आणि मिशन LiFE अंतर्गत पर्यावरणपूरक जीवनशैलीला प्रोत्साहन देणाऱ्या उपक्रमांचा समावेश होता.

या मूल्यांकनात केवळ शाळांमध्ये सुविधा उपलब्ध आहेत की नाहीत, यापुरते मर्यादित न राहता त्यांचा नियमित वापर, देखभाल आणि विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेच्या सवयी विकसित होत आहेत का, यालाही विशेष महत्त्व देण्यात आले.

विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेच्या सवयी रुजविण्याचा प्रयत्न

स्वच्छ व हरित विद्यालय मानांकन उपक्रमामुळे शाळांना आपल्या सुविधांची सद्यस्थिती समजून घेण्यासोबतच सुधारणा आवश्यक असलेल्या बाबी निश्चित करून त्यावर नियोजनबद्ध काम करण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेच्या सवयी, आरोग्यविषयक जागरूकता आणि पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी विकसित करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत आहे. पालघर जिल्ह्यातील शाळांनी केलेली ही प्रगती विद्यार्थ्यांसाठी अधिक स्वच्छ, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक शैक्षणिक वातावरण निर्माण करण्याच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.

Share:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *