कोकणानंतर नाशिकमध्येही जिजाऊचा विस्तार!

Share:

युवकांच्या स्वप्नांना मिळणार मोफत प्रशिक्षणाचे बळ

नाशिकमध्ये UPSC/MPSC मार्गदर्शन केंद्र, पोलीस-सैन्य भरती प्रशिक्षण आणि मोफत अभ्यासिकेचा शुभारंभ

नाशिक : जनतेचा वाली ,प्रशासकीय अधिकारी होण्याचे आणि पोलीस, सैन्य दलासह विविध गणवेशधारी सेवांमध्ये दाखल होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या नाशिकमधील युवक-युवतींसाठी आनंदाची बातमी आहे. जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, महाराष्ट्र यांच्या वतीने संस्थापक निलेश सांबरे यांच्या पुढाकाराने नाशिकमध्ये मोफत UPSC/MPSC स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, पोलीस व सैन्य भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र आणि मोफत अभ्यासिकेचा शुभारंभ सोमवार, २ नोव्हेंबर २०२६ रोजी उत्साहात पार पडला.

या उपक्रमामुळे नाशिक आणि परिसरातील होतकरू विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची तयारी, भरतीपूर्व प्रशिक्षण आणि अभ्यासासाठी आवश्यक सुविधा विनामूल्य उपलब्ध होणार आहेत.

युवकांच्या स्वप्नांना दिशा देण्याचा संकल्प

शुभारंभ सोहळ्याची सुरुवात प्रतिमापूजनाने झाली. उपस्थित मान्यवरांचे स्वागत व सत्कार करण्यात आला. यावेळी विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी मार्गदर्शन करत या उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित केले.

संस्थापक निलेश सांबरे यांनी आपल्या भाषणात नाशिकमधील युवकांना प्रशासकीय सेवेत तसेच पोलीस, सैन्य, अग्निवीर आणि अग्निशमन दलात भरती होण्यासाठी योग्य मार्गदर्शन व प्रशिक्षण उपलब्ध करून देण्याचा संस्थेचा उद्देश स्पष्ट केला. आर्थिक अडचणींमुळे कोणत्याही होतकरू विद्यार्थ्याचे स्वप्न अपूर्ण राहू नये, यासाठी जिजाऊ संस्था सातत्याने प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.

मान्यवरांची उपस्थिती

या कार्यक्रमाला नाशिकचे उपमहापौर विलास अण्णा शिंदे, वसंतराव नारायण नाईक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कोंडाजी (मामा) आव्हाड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता सूर्यकांत शंकर अहिरे, आर.टी. प्रोजेक्ट अँड फायनान्स प्रा. लि.चे संचालक प्रशांत तिवारी, नगरसेवक तथा सभापती प्रशांत दिवे, कल्याणी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या संस्थापक-अध्यक्षा सुनीता मोडक, प्रशिक्षक नंदिनी रामचंदानी, ब्रेनी वूड लॅबचे महाराष्ट्र प्रमुख मोहन सूर्यवंशी आणि रेडिओ सिटी ९५.० एफएमच्या रेडिओ जॉकी गायत्री चव्हाण यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

कोकणातील सेवाकार्याचा नाशिकपर्यंत विस्तार

गेल्या दोन दशकांपासून जिजाऊ संस्था संस्थापक निलेश सांबरे यांच्या नेतृत्वाखाली कोकणातील पाच जिल्ह्यांमध्ये शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण, रोजगारनिर्मिती, शेतीविकास आणि युवकांच्या प्रशिक्षणासाठी कार्यरत आहे.

संस्थेच्या माध्यमातून १० मोफत इंग्रजी माध्यमाच्या CBSE शाळा, ५४ मोफत UPSC/MPSC अकॅडमी व अभ्यासिका आणि ३६ मोफत पोलीस-सैन्य भरती प्रशिक्षण अकॅडमींचे जाळे उभारण्यात आले आहे. दरवर्षी ३५ लाख मोफत वह्यांचे वाटप करण्यात येते. तसेच ठाणे, पालघर आणि रत्नागिरी येथे औषधांसह अत्याधुनिक मोफत रुग्णालयांच्या माध्यमातून आरोग्यसेवाही उपलब्ध करून दिली जात आहे.

कोकणातील सेवाकार्याचा विस्तार करत जिजाऊ संस्थेने आता नाशिकमध्येही पहिले मोफत केंद्र सुरू केले आहे. या उपक्रमातून युवकांना शिक्षण, मार्गदर्शन आणि प्रशिक्षणाच्या माध्यमातून स्वप्नपूर्तीची संधी मिळणार असून, नाशिकमधील युवकांच्या भविष्याला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

जनतेचा वाली | जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणारे वृत्तपत्र

Share:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *