पर्यावरणपूरक जीवनशैलीचा संकल्प; पालघर जिल्ह्यात १ ते ७ नोव्हेंबरदरम्यान ‘ब्रिक्स शाश्वत जीवनशैली सप्ताह’

Share:

मिशन लाईफच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धन आणि स्वच्छतेला प्रोत्साहन; ग्रामपंचायती, शाळा आणि नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा

पालघर | २ नोव्हेंबर २०२६

पर्यावरण संवर्धन, नैसर्गिक संसाधनांचे जतन आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीचा प्रसार करण्याच्या उद्देशाने पालघर जिल्ह्यात १ ते ७ नोव्हेंबरदरम्यान ‘ब्रिक्स शाश्वत जीवनशैली सप्ताह’ साजरा करण्यात येत आहे. या सप्ताहाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनासाठी नागरिकांमध्ये जागृती निर्माण करण्याबरोबरच प्रत्यक्ष कृतीतून शाश्वत जीवनशैलीचा अंगीकार करण्यावर भर देण्यात येणार आहे.

भारताच्या २०२६ मधील ब्रिक्स अध्यक्षपदाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या वतीने देशभरात या सप्ताहाचे आयोजन करण्यात येत आहे. ‘मिशन लाईफ’च्या संकल्पनांवर आधारित या अभियानातून नैसर्गिक संसाधनांचा काटकसरीने वापर आणि पर्यावरणपूरक सवयींचा प्रसार केला जाणार आहे.

जिल्ह्यातील ग्रामपंचायती, शाळा, युवक मंडळे, महिला मंडळे, स्वयंसहायता महिला गट आणि विविध शासकीय विभागांच्या माध्यमातून जनजागृती व कृतीशील उपक्रम राबविण्यात येणार आहेत. एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकचा वापर टाळणे, ई-कचऱ्याची निर्मिती कमी करणे आणि कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन याबाबत नागरिकांना प्रबोधन केले जाणार आहे.

घनकचरा व्यवस्थापन नियम २०२६ बाबत माहिती देतानाच घरगुती स्तरावर कचऱ्याचे चार प्रकारांत वर्गीकरण करण्यासाठी जनजागृती करण्यात येणार आहे. प्लास्टिकचा वापर कमी करणे, वस्तूंचा पुनर्वापर आणि पुनर्चक्रण या ‘३ आर’ (Reduce, Reuse, Recycle) त्रिसूत्रीचा प्रसारही या सप्ताहाचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे.

घरगुती वापरानंतर निर्माण होणाऱ्या सांडपाण्याचे (ग्रे-वॉटर) योग्य व्यवस्थापन, सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता, शासकीय कार्यालयांचे परिसर आणि जलस्रोत स्वच्छ ठेवण्यासाठी विशेष मोहिमा राबविण्यात येणार आहेत. या उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ग्रामस्तरावर लोकसहभाग वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे.

पाणी आणि विजेचा काटकसरीने वापर, प्लास्टिकचा वापर टाळणे, कचऱ्याचे निर्मितीच्या ठिकाणीच वर्गीकरण आणि वस्तूंचा पुनर्वापर अशा दैनंदिन कृतींतून पर्यावरण संवर्धनाला मोठा हातभार लागू शकतो.

“नागरिकांनी आपल्या दैनंदिन जीवनात पर्यावरणपूरक सवयींचा अंगीकार करून या अभियानात सक्रिय सहभाग नोंदवावा,” असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी केले आहे.

तसेच जिल्ह्यातील ग्रामपंचायती, शाळा, युवक मंडळे, महिला मंडळे, स्वयंसहायता महिला गट, शासकीय विभाग आणि नागरिकांनी या सप्ताहात उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे आणि जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनचे प्रभारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय भोये यांनी केले आहे.

पर्यावरण संवर्धन ही केवळ शासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. दैनंदिन जीवनातील छोट्या बदलांतून शाश्वत आणि स्वच्छ भविष्य घडविण्याचा संदेश या सप्ताहातून देण्यात येणार आहे.

Share:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *