सातिवलीच्या महादेव मंदिरात भगवा ध्वज दिमाखात फडकला; आमदार विलास तरे यांच्या हस्ते ध्वजारोहण

Share:

सातिवली, पालघर : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सातिवली येथील प्रसिद्ध गरम पाण्याच्या कुंडाजवळ असलेल्या श्री महादेव मंदिरात भगव्या ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. बोईसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार विलास तरे यांच्या हस्ते हा धार्मिक सोहळा पार पडला. यावेळी मंदिरात दर्शन घेऊन त्यांनी धार्मिक परंपरेप्रती आपली श्रद्धा व्यक्त केली.

भगवा ध्वज हा त्याग, तपस्या, शौर्य आणि आध्यात्मिक परंपरेचे प्रतीक मानला जातो. सिंहस्थ कुंभमेळ्यासारख्या महत्त्वपूर्ण धार्मिक पर्वाच्या निमित्ताने सातिवली येथील महादेव मंदिर परिसरात भगवा ध्वज फडकविण्यात आल्याने परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.

सातिवली येथील गरम पाण्याचे कुंड आणि श्री महादेव मंदिराला परिसरातील भाविकांच्या श्रद्धेच्या दृष्टीने विशेष महत्त्व आहे. या ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळाच्या सांस्कृतिक वारशाचे जतन करण्याच्या दृष्टीने ध्वजारोहण सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले.

या कार्यक्रमाला माजी आमदार अमित घोडा, ज्येष्ठ नेते प्रभाकर विचारे, माजी जिल्हा परिषद सदस्य जयवंत गरुडा, माजी सभापती संतोष बुकले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती दिलीप मरले, सातिवली ग्रामपंचायतीचे सरपंच तथा सातिवली मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष कृष्णा जाधव, उपसरपंच गंगाराम करपट यांच्यासह सुभाष लहांगे, रमेश डवला, राहुल श्रावणे, संदीप उराडे, रमेश पाटील, आकाश जाधव, रमेश शेळके, जयेश लहांगे आणि गणपत लोहार उपस्थित होते.

तसेच मंदिर समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या धार्मिक सोहळ्यात सहभाग घेतला. भगव्या ध्वजाच्या ध्वजारोहणामुळे सातिवलीतील महादेव मंदिर परिसरात धार्मिक उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

Share:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *