जनतेचा वाली | बातमीपत्र
दुष्काळात पशुधनाच्या चाऱ्याचा प्रश्न सुटणार; शासनाकडून दर निश्चित!
सुक्या चाऱ्याला प्रतिकिलो १२ रुपये, तर मुरघासाला ८ रुपये आधारभूत दर; पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांची माहिती
मुंबई : राज्यातील दुष्काळी परिस्थितीत पशुधनाच्या चारा टंचाईवर मात करण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. पशुधनासाठी खरेदी करण्यात येणाऱ्या सुक्या चाऱ्याचा कमाल आधारभूत दर प्रतिकिलो १२ रुपये, तर मुरघासाचा दर प्रतिकिलो ८ रुपये निश्चित करण्यात आला आहे. हे दर वाहतूक खर्च वगळून असून, दुष्काळ जाहीर केलेल्या कालावधीत लागू राहणार आहेत. पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी ही माहिती दिली.
राज्यातील खरीप हंगामातील परिस्थितीचा आढावा घेत आतापर्यंत ३०४ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर संभाव्य चारा टंचाईचा सामना करण्यासाठी महसूलमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ उपसमितीने अभ्यासगटाची स्थापना केली होती. या अभ्यासगटाने राज्यासह इतर राज्यांतील चारा व्यवस्थापनाचा अभ्यास करून उपलब्ध चारा, संभाव्य उत्पादन आणि आगामी काळातील गरज लक्षात घेऊन अहवाल सादर केला. २७ ऑक्टोबर रोजी झालेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत या अहवालाला मान्यता देण्यात आली.
चाऱ्याच्या दरांसोबतच त्याच्या गुणवत्तेबाबतही शासनाने निकष निश्चित केले आहेत. सुक्या चाऱ्यातील ओलावा १५ टक्क्यांपेक्षा अधिक नसावा, तसेच चारा बुरशी, कीड, माती आणि कुबट वासापासून मुक्त असावा. ज्वारी व बाजरीच्या चाऱ्याला प्राधान्य दिले जाणार आहे. तर मुरघास हवाबंद आणि बुरशीमुक्त असणे आवश्यक असून, त्याच्या गुणवत्तेसाठी ओलावा, पीएच आणि प्रथिनांचे प्रमाण निश्चित करण्यात आले आहे.
जिल्हास्तरीय दुष्काळ व्यवस्थापन कार्यकारी समितीच्या माध्यमातून चारा खरेदीची कार्यवाही केली जाणार आहे. वाहतूक खर्चासाठी परिवहन आयुक्तांनी निश्चित केलेले दर लागू राहतील.
दुष्काळात शेतीच्या उत्पन्नावर परिणाम होत असतानाच पशुधनाच्या चाऱ्याचा प्रश्न शेतकऱ्यांसमोर गंभीर बनतो. पशुधन हे ग्रामीण अर्थव्यवस्थेचे आणि शेतकऱ्यांच्या उपजीविकेचे महत्त्वाचे साधन असल्याने चारा खरेदीचे दर निश्चित करण्याचा निर्णय दिलासादायक मानला जात आहे. मात्र, या निर्णयाची जिल्हास्तरावर प्रभावी अंमलबजावणी होऊन प्रत्यक्ष पशुपालकांपर्यंत त्याचा लाभ पोहोचतो का, हे महत्त्वाचे ठरणार आहे.
