
मुंबई/पालघर, प्रतिनिधी —
महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी रोटरी डिस्ट्रिक्ट ३१४१ तर्फे ‘रोटरी पिंक ऑटो’ हा अभिनव उपक्रम राबवण्यात येत असून, मुंबई व पालघर जिल्ह्यात लवकरच १,००० पिंक ऑटो रिक्षा रस्त्यावर धावणार आहेत. या उपक्रमामुळे १,००० महिलांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना थेट रोजगार व उत्पन्नाची संधी उपलब्ध होणार आहे.
या प्रकल्पाची औपचारिक सुरुवात मुंबईतील मुलुंड येथे १० पिंक ऑटो रिक्षांच्या वाटपाने करण्यात आली. हा सोहळा रोटरी इंटरनॅशनलचे अध्यक्ष फ्रान्सिसको अरेझु तसेच डिस्ट्रिक्ट गव्हर्नर डॉ. मनीष मोटवानी यांच्या शुभहस्ते पार पडला. महिलांना स्वतःचा उदरनिर्वाह करण्याचा आत्मविश्वास देणे आणि सुरक्षिततेची भावना निर्माण करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
योजनेअंतर्गत महिलांना मोफत ऑटो ड्रायव्हिंग प्रशिक्षण देण्यात येणार असून, वाहन परवाना, बिल्ला व परमिट मिळवण्यासाठी विशेष सहाय्य केले जाणार आहे. तसेच सवलतीच्या दरात ऑटो रिक्षा, कर्जासाठी मार्गदर्शन आणि डाउन पेमेंटची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
या योजनेसाठी किमान सातवी उत्तीर्ण, महाराष्ट्रात किमान १५ वर्षांचे वास्तव्य, आधार व पॅन कार्ड, राष्ट्रीयीकृत बँकेत खाते आणि कोणताही पोलीस रेकॉर्ड नसणे अशी पात्रता निश्चित करण्यात आली आहे.
‘रोटरी पिंक ऑटो’ ही केवळ वाहतूक सेवा नसून महिलांच्या स्वाभिमानाची, सुरक्षिततेची आणि स्वावलंबनाची ओळख ठरणार असल्याचे मत रोटरीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले. या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन रोटरीचे जिल्हा मुख्य समन्वयक भगवान पाटील यांनी इच्छुक महिलांना केले आहे.
