
प्राचार्य डॉ. बी. ए. राजपूत यांना ‘आदर्श प्राचार्य’ पुरस्कार
तलासरी :
आदिवासी व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील संशोधनप्रवाहांशी जोडण्याच्या उद्देशाने तलासरी येथील आदिवासी प्रगती मंडळ संचलित कॉ. गोदावरी शामराव परुळेकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात शनिवारी (३१ जानेवारी) बहुविद्याशाखीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले. ‘मानविकी, विज्ञान, वाणिज्य आणि व्यवस्थापन क्षेत्रातील नाविन्यपूर्ण व उदयोन्मुख प्रवाह’ या विषयावरील या परिषदेत देश-विदेशातील सुमारे २०० संशोधकांनी प्रत्यक्ष व ऑनलाइन पद्धतीने शोधनिबंध सादर केले.
परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी मान्यवरांनी महाविद्यालयातील आदिवासी संस्कृती संग्रहालयाला भेट देत वारली समाजाची परंपरा जाणून घेतली. उद्घाटक प्रा. डॉ. ए. डी. सावंत (माजी कुलगुरू, राजस्थान विद्यापीठ; माजी प्र-कुलगुरू, मुंबई विद्यापीठ) यांनी संशोधनाची गरज अधोरेखित करत नव्या पिढीला संशोधनासाठी प्रेरित केले. विशेष अतिथी प्रा. डॉ. के. एन. घोरुडे यांनी संशोधन प्रक्रिया व प्रकाशनातील बदलांवर मार्गदर्शन केले. परदेशी तज्ज्ञ प्रा. डॉ. कुले जेराल्ड (युगांडा) व प्रा. डॉ. गोडविन केटो (घाना) यांनी तरुणांचे संशोधनातील योगदान तसेच भारतीय संस्कृतीचे समकालीन महत्त्व अधोरेखित केले.
या परिषदेच्या निमित्ताने लोकशक्ती बाबा भारती प्रतिष्ठान, पुणे यांच्या वतीने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. ए. राजपूत यांना ‘आदर्श प्राचार्य’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ग्रामीण व अतिदुर्गम भागातील शिक्षणविकासासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाची दखल म्हणून हा पुरस्कार देण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.
परिषदेत मानविकी, समाजशास्त्र, साहित्य, विज्ञान-तंत्रज्ञान (एआय, नॅनो टेक्नॉलॉजी), वाणिज्य, व्यवस्थापन, ग्रंथालयशास्त्र, भारतीय ज्ञान प्रणाली व शाश्वत विकास या विषयांवर चर्चासत्रे झाली. दुपारच्या टेक्निकल सत्रांचे अध्यक्षपद प्राचार्य डॉ. सूचिता करवीर, डॉ. सोमनाथ विभूते, प्रा. डॉ. संदीप बेले व प्राचार्य डॉ. विष्णू यादव यांनी भूषवले.
निरोपसमारंभात आदिवासी प्रगती मंडळाचे सचिव कॉम. रुपेश राणे यांनी परिषदेस यशस्वी आयोजनाबद्दल महाविद्यालयाचे अभिनंदन केले. सूत्रसंचालन प्रा. दीपक वाकडे व प्रा. दिपाली भापकर यांनी केले. परिषदेच्या यशासाठी समन्वयक प्रा. निलेश साळवे यांच्यासह सर्व प्राध्यापक व कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.
