ग्रामविकासासोबत गावसुरक्षेची जबाबदारी पत्रकारांनी लेखणीतून पेलावी – पद्मश्री पोपटराव पवार

मुंबई, दि. १५ डिसेंबर : ग्रामीण भागातील वाढते स्थलांतर, गावगाड्याची ढासळती अवस्था आणि शेती-कृषीसमोरील प्रश्न या पार्श्वभूमीवर गाव सुरक्षित राहण्यासाठी पत्रकारांनी आपल्या लेखणीचा ताकदीने वापर करावा, असे आवाहन आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार यांनी केले. शहरे सुरक्षित राहण्यासाठी गावांचे सुरक्षित व सक्षम राहणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

बीड जिल्ह्यातील देवडी (ता. वडवणी) येथील माणिकबागेत स्वातंत्र्यसैनिक माणिकराव देशमुख यांच्या नावाने दिल्या जाणाऱ्या विविध पुरस्कारांचे वितरण पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. याच कार्यक्रमात बीड जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकारांचा सन्मानही करण्यात आला.

पवार म्हणाले, वारकरी-संत परंपरेतून उभा राहिलेला गावगाडा आज संकटात आहे. ग्रामविकास आणि कृषी हा भारताचा आत्मा असल्याने पत्रकारांनी या क्षेत्रांकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. सत्तेत कोणता पक्ष आहे यापेक्षा ग्रामीण विकासाबाबत नेतृत्वाचे स्पष्ट ‘व्हिजन’ काय आहे, याचा वेध पत्रकारितेने घ्यावा. गाव, शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रयोगशीलतेच्या कथा समाजासमोर आणण्याची जबाबदारी पत्रकारांची आहे.

हिवरेबाजारच्या प्रवासाचा संदर्भ देत पवार यांनी या वाटचालीत राज्यभरातील पत्रकारांचे योगदान कसे निर्णायक ठरले, याची माहिती दिली. मुंबईसह शहरी भागातील पत्रकारांना ग्रामीण भागात घेऊन येण्यामध्ये अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांचा मोठा वाटा असल्याचेही त्यांनी नमूद केले.

यावेळी परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख म्हणाले, १९३९ साली स्थापन झालेली अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद शतकोत्तर महोत्सवाकडे वाटचाल करीत आहे. परिषदेत सुमारे १२ हजार सदस्य असून शहरी पत्रकारांची संख्या मोठी आहे. ग्रामीण भागातील प्रश्न प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी पत्रकारांच्या बैठका व कार्यक्रम आता गावागावात घेण्याचा नवा पायंडा सुरू करण्यात आला आहे.

कार्यक्रमात स्वातंत्र्यसैनिक माणिकराव देशमुख यांच्या नावाने देण्यात येणाऱ्या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. बीड जिल्ह्याच्या जडणघडणीत योगदान देणाऱ्या पाच ज्येष्ठ पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. दिव्यांगांना न्याय मिळवून देणारे दीपक कैतके, मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष दिलीप सपाटे आणि आदर्श शेतकरी कल्याणराव कुलकर्णी यांचा विशेष गौरव झाला. तसेच माणिकराव देशमुख सामाजिक विकास प्रतिष्ठानच्या वतीने समाजभूषण पुरस्कार अमर हबीब, पत्रभूषण पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार सुहास देशमुख आणि कृषीभूषण पुरस्कार देवडी येथील आदर्श शेतकरी गोरख झाटे यांना प्रदान करण्यात आला.

उपमुख्यमंत्र्यांचे आरोग्य कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांनी पत्रकारांसाठी उपलब्ध असलेल्या विविध आरोग्य योजनांची माहिती देत त्यांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. परिषदेचे अध्यक्ष मिलिंद अष्टिवकर यांनी प्रास्ताविक केले, तर आभार बीड जिल्हाध्यक्ष विशाल साळुंके यांनी मानले. कार्यक्रमानंतर अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या विस्तारित कार्यकारिणीची बैठक पार पडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *