पालघर: अॅमेझॉन आणि आंतरराष्ट्रीय पीक संशोधन संस्था (ICRISAT) यांनी ९ ऑक्टोबर २०२६ रोजी पालघर जिल्ह्यातील आबिटगढ गावात शेतकरी दिन साजरा केला. यावेळी स्थानिक आदिवासी शेतकऱ्यांच्या पाणी आणि माती संवर्धनातील योगदानाचा गौरव करण्यात आला.
हा कार्यक्रम ‘रिजनरेटिव्ह लँडस्केप फॉर ट्रान्सफॉर्मिंग स्मॉलहोल्डर अॅग्री-फूड सिस्टीम्स’ या उपक्रमाच्या पहिल्या वर्षपूर्तीच्या निमित्ताने आयोजित करण्यात आला होता. हा उपक्रम पालघर जिल्ह्यातील १,५०० हेक्टर क्षेत्रात राबवला जात आहे. यात जमिनीची धूप, पाणीटंचाई आणि लहान शेतकऱ्यांची असुरक्षितता या प्रश्नांवर समुदायाच्या सहभागातून काम केले जाते.
आतापर्यंत या उपक्रमांतर्गत पाणी व्यवस्थापनासाठी ९७ बांधकामे करण्यात आली आहेत. यात पाणी साठवण संरचना, शेततळी, दगडी टाक्या आणि ओढे खोलीकरण यांचा समावेश आहे. यामुळे सुमारे ३,२८,९०० घनमीटर पाणी साठवण क्षमता निर्माण झाली आहे. यामुळे संरक्षणात्मक सिंचन शक्य झाले असून कोरड्या हंगामातही पीक घेता येणार आहे.
मातीचे पोषण, वनशेती आणि पिकांच्या आरोग्यातील सुधारणांमुळे सुमारे ७०० आदिवासी शेतकरी कुटुंबांना थेट लाभ झाला आहे. रब्बी हंगामात उत्पादन वाढेल आणि त्यामुळे कुटुंबांच्या उत्पन्नात सुमारे ८० टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
या कार्यक्रमाला शाहापूरचे आमदार, पालघर कृषी संशोधन केंद्राचे अधिकारी, ICRISAT चे शास्त्रज्ञ आणि शेतकरी कुटुंबे उपस्थित होती.
स्त्रोत: ICRISAT, अॅमेझॉन उपक्रम अहवाल