
बहाडोली, दि. ६ (प्रतिनिधी जनतेचा वाली ) : पालघर तालुक्यातील बहाडोली गावाची ग्रामदेवता सतुबाईदेवीची वार्षिक यात्रा मंगळवार, १४ एप्रिल रोजी चैत्र कृष्णपक्ष द्वादशी निमित्त मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे. अनेक वर्षांची परंपरा जपत हा यात्रोत्सव यंदाही भक्तिभाव आणि जल्लोषात पार पडणार असल्याने पंचक्रोशीतील भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध गावांमधून हजारो भाविक देवीच्या दर्शनासाठी बहाडोलीत दाखल होणार असून, विविध जाती-धर्मांतील नागरिकांचा सहभाग हे या यात्रेचे वैशिष्ट्य मानले जाते. या उत्सवामुळे गावकऱ्यांमध्ये ऐक्य आणि श्रद्धेची भावना अधिक दृढ होत असल्याचे स्थानिकांनी सांगितले.
श्री ग्रामदेवी सतुबाईदेवी यात्रा उत्सव मंडळ, ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांच्या सहकार्याने यात्रोत्सवाचे नियोजन करण्यात आले आहे. यात्रेच्या आदल्या दिवशी देवीचे जागरण कीर्तन होणार असून, यात्रेच्या दिवशी सकाळी देवीची पालखी काढण्यात येणार आहे. रात्री कव्वालीचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला आहे.
ऐतिहासिकदृष्ट्या या मंदिराला विशेष महत्त्व असून ‘नवसाला पावणारी देवी’ म्हणून पंचक्रोशीत सतुबाईदेवीची ख्याती आहे. यात्रेच्या निमित्ताने बहाडोली गावात मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी अपेक्षित आहे.