तलासरीत ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ संपन्नआमदार विनोद निकोले यांची उपस्थिती; नागरिकांच्या महसुली प्रश्नांना दिलासा

तलासरीत ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ संपन्न

पालघर, जनतेचा वाली : महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर अभियान’ अंतर्गत तलासरी तहसील कार्यालयात शनिवारी महसूल समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या कार्यक्रमाला आमदार विनोद निकोले यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी तहसीलदार अमोल फाठक, नगराध्यक्ष सुरेश भोये, उपनगराध्यक्ष सुभाष दुमडा, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता प्रशांत ठाकरे तसेच विविध विभागांचे अधिकारी आणि स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. शिबिरादरम्यान नागरिकांच्या महसूल व इतर शासकीय सेवांशी संबंधित प्रश्नांचा तत्काळ निपटारा करण्यावर भर देण्यात आला.
शिबिरात नागरिकांना ७/१२ उतारे, ८-अ उतारे तसेच विविध दाखले यांचे वितरण करण्यात आले. तसेच ७/१२ अद्यावत करणे, ई-मोजणी, पाणंद रस्त्यांबाबत कार्यवाही, अभिलेख दुरुस्ती हेल्पडेस्क, अकृषिक सुधारणा मार्गदर्शन, पीएम किसान योजना, दुय्यम शिधापत्रिका वाटप, प्रलंबित फेरफार निकाली काढणे, तुकडेबंदी कायद्याअंतर्गत कार्यवाही, सामाजिक अर्थसहाय्य योजनांचा लाभ, आरोग्य तपासणी, मोफत डिजिटल सातबारा, वनपट्ट्यावर सातबारा नोंदणी, लक्ष्मी मुक्ती योजना तसेच प्रॉपर्टी कार्ड आदी सेवा नागरिकांना एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या.
महसूल विभागाशी संबंधित प्रलंबित प्रकरणांचा जलदगतीने निपटारा करण्यासाठी शासनाने राबविलेल्या ‘सिंगल डे सर्व्हिस डिलिव्हरी’ उपक्रमामुळे नागरिकांना शासकीय सेवा सुलभ व पारदर्शक पद्धतीने मिळत असल्याची प्रतिक्रिया उपस्थितांनी व्यक्त केली. शासनाचा हा उपक्रम सर्वसामान्य नागरिक व शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *