
बालासाहेब ठाकरे जन्मशताब्दीनिमित्त ‘जागर स्त्री शक्तीचा
मुंबई : जनतेचा वाली हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त विश्वास फौंडेशनच्या वतीने “जागर स्त्री शक्तीचा” या विशेष अंकाचे प्रकाशन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव करण्याच्या उद्देशाने हा विशेष अंक प्रकाशित करण्यात आला आहे.
या प्रसंगी बोलताना उद्धव ठाकरे यांनी सांगितले की, बाळासाहेब ठाकरे यांनी आयुष्यभर सामान्य माणूस, महिला आणि वंचित घटकांच्या हक्कासाठी ठामपणे आवाज उठवला. समाजात महिलांचा सन्मान आणि सक्षमीकरण अधिक बळकट करण्यासाठी अशा उपक्रमांची आज नितांत गरज आहे. विश्वास फौंडेशनने महिलांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी घेतलेला हा पुढाकार प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले.
“जागर स्त्री शक्तीचा” या विशेष अंकामध्ये विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या महिलांच्या यशोगाथा, सामाजिक योगदान आणि प्रेरणादायी अनुभवांचा समावेश करण्यात आला आहे. या माध्यमातून समाजात स्त्री शक्तीबद्दल जागरूकता निर्माण करण्याचा तसेच महिलांच्या कर्तृत्वाला व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाला सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी विश्वास फौंडेशनच्या या उपक्रमाचे कौतुक करत महिलांच्या सक्षमीकरणासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले.