
केळवे येथे “झोन सोशल – फुलो की होली रंगोत्सव”चा जल्लोष; २१ क्लबचा गौरव
सफाळे, ता. ४ :जनतेचा वाली
लायन्स इंटरनॅशनल डिस्ट्रीक्ट ३२३१ ए३, रिजन १ अंतर्गत झोन १ व २ चा संयुक्त “झोन सोशल – फुलो की होली रंगोत्सव” कार्यक्रम केळवे येथे उत्साहात पार पडला. निवांत रिसॉर्टच्या निसर्गरम्य वातावरणात झालेल्या या सोहळ्यात भाईंदर ते बोर्डीपर्यंतच्या दोन्ही झोनमधील पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले.
झोन चेअरपर्सन लायन प्रमोद पाटील व लायन सचिन गांधी यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रिजन चेअरपर्सन लायन अतुल दांडेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लायन मनोज बाबुर, पहिले व्हाईस डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लायन नटवर बांका आणि दुसरे व्हाईस डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लायन विकास सराफ यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पडला.
डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लायन मनोज बाबुर यांनी समाजसेवेतील महिलांच्या योगदानाचे विशेष कौतुक केले. “सेवाकार्यात गुंतलेल्या पुरुषांच्या अनुपस्थितीत कुटुंबाची जबाबदारी महिला समर्थपणे सांभाळतात. त्यामुळे त्यांच्या योगदानाचा सन्मान करणे आवश्यक आहे,” असे त्यांनी नमूद केले. तसेच प्रत्येक क्लबने नवीन सदस्य नोंदणी वाढवून सेवा उपक्रमांचा विस्तार करण्याचे आवाहनही केले.
प्रास्ताविकात प्रमोद पाटील यांनी “फुलो की होली” या पर्यावरणपूरक संकल्पनेची माहिती देत प्रदूषणमुक्त सण साजरे करण्याचा संदेश दिला. सचिन गांधी यांनी झोनमधील विविध क्लबच्या कार्याचा आढावा सादर केला. रिजन चेअरपर्सन अतुल दांडेकर यांनी दोन्ही झोनच्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.
या वेळी भाईंदर ते बोर्डी परिसरातील २१ क्लबचा विशेष सन्मान करण्यात आला. सामाजिक कार्य, सेवा उपक्रम आणि संघटनात्मक कार्यातील योगदानाबद्दल प्रतिनिधींना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
“फुलो की होली” या थीमनुसार फुलांची होळी साजरी करत पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. सांस्कृतिक कार्यक्रम, संगीत, नृत्य आणि संवादातून उपस्थितांनी रंगोत्सवाचा आनंद लुटला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी झोन सेक्रेटरी चेतन सावे तसेच सर्व पदाधिकारी व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. जतिन कदम आणि किरण परीहार यांनी सूत्रसंचालन केले.
या कार्यक्रमातील “Call Me” सेल्फी पॉइंट, बीच बाईकवर मान्यवरांची एन्ट्री, फुलांची उधळण आणि सांस्कृतिक सादरीकरणे हे कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले.