तारापूर एमआयडीसी ‘भोपाल’च्या मार्गावर? ओलियम गळतीने वाजली धोक्याची घंटा

तारापूर एमआयडीसी ‘भोपाल’च्या मार्गावर? ओलियम वायू गळती
पालघर : तारापूर एमआयडीसी येथील डी झोनमधील भगेरिया केमिकल्स (पूर्वीची झेनित केमिकल्स) या रासायनिक कारखान्यात मंगळवारी दुपारी ओलियम वायूची गळती झाल्याने परिसरात खळबळ उडाली. दुपारी दोन ते सव्वा दोनच्या सुमारास सुरू झालेल्या या गळतीमुळे कामगार व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून ही घटना भविष्यात मोठ्या दुर्घटनेची धोक्याची घंटा ठरत असल्याची चर्चा सुरू आहे.
ओलियम हवेच्या संपर्कात आल्याने सल्फर डाय ऑक्साईडसह इतर सल्फर ऑक्साईड्स तयार होतात. वाऱ्याची दिशा पश्चिमेकडून पूर्वेकडे असल्याने वायूचा परिणाम सुमारे एक ते दीड किलोमीटरपर्यंत जाणवल्याची प्राथमिक माहिती आहे. डोळ्यांना चुरचुरणे, डोळे लाल होणे, घशात खवखव व कोरडेपणा अशी लक्षणे काही कामगारांनी व्यक्त केली.
घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी आपत्कालीन यंत्रणा सतर्क केल्या. महसूल विभाग, पोलिस प्रशासन व अन्य यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ चे उपप्रादेशिक अधिकारी राजू वसावे यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला.
कंपनीलगतचा मार्ग तात्पुरता बंद करण्यात आला असून पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ च्या अग्निशामन दलाकडून गळती रोखण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
दरम्यान, औद्योगिक वसाहतीत वारंवार घडणाऱ्या रासायनिक घटनांमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. वेळेत काटेकोर उपाययोजना न झाल्यास तारापूर एमआयडीसी ‘भोपाल’च्या मार्गावर असल्याची भीती व्यक्त होत आहे. प्रशासनाने दीर्घकालीन सुरक्षाव्यवस्था मजबूत करावी, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *