
तलासरीत ‘खासदार आपल्या दारी’ला प्रतिसाद; ८० अर्जांवर तात्काळ कार्यवाही
तलासरी ( जनतेचा वाली )जनतेच्या समस्या थेट ऐकून त्यांचे त्वरित निराकरण करण्याच्या उद्देशाने आयोजित ‘खासदार आपल्या दारी – जनता दरबार’ उपक्रमाला तलासरीत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. डॉ. हेमंत विष्णु सवरा यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (२७ फेब्रुवारी २०२६) पंचायत समिती सभागृहात हा जनता दरबार पार पडला.
सकाळी ११ वाजता सुरू झालेल्या या दरबारात नागरिकांनी विविध विभागांशी संबंधित तक्रारी, सूचना आणि मागण्या थेट खासदारांसमोर मांडल्या. एकूण ८० अर्ज प्राप्त झाले. त्यामध्ये पंचायत समिती तलासरी (४२), तहसील कार्यालय (१६), तालुका कृषी अधिकारी (२), नगरपंचायत (२), महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी (४), वनविभाग (१), सार्वजनिक बांधकाम विभाग (४), राष्ट्रीय महामार्ग (२), उपविभागीय अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी (४), लघु पाटबंधारे विभाग (१) आणि दुग्ध प्रकल्प दापचरी (२) यांचा समावेश होता.
संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित राहून अनेक प्रकरणांवर तत्काळ कार्यवाही करण्यात आली, तर उर्वरित प्रकरणांवर प्राधान्याने निर्णय घेण्याचे निर्देश देण्यात आले. पारदर्शक प्रशासन आणि थेट संवादातून विकासकामांना गती देण्याचा प्रयत्न असल्याचे खासदारांनी नमूद केले.
दरम्यान, “सर्वसामान्यांची कामे प्रशासनाने नियमितपणे सोडवली, तर जनता दरबार घेण्याची वेळ पुन्हा येणार नाही,” असे स्पष्ट करत तक्रारींचे मूळ पातळीवर निराकरण करण्याचे आवाहन करण्यात आले.
यावेळी तलासरीचे तहसीलदार अमोल पाठक, भाजपा अध्यक्ष विवेक करमारे, पोलीस निरीक्षक अजय गोरड, तसेच विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
