दहिसर–डहाणू परिसरातील बॅंक ऑफ महाराष्ट्र निवृत्त कर्मचाऱ्यांचा उत्साही मेळावा

दहिसर–डहाणू परिसरातील बॅंक ऑफ महाराष्ट्र निवृत्त कर्मचाऱ्यांचा मेळावा
वसई : जनतेचा वाली )Bank of Maharashtra Retired Employees’ Organisation तर्फे दहिसर ते डहाणू परिसरातील निवृत्त कर्मचाऱ्यांचा मेळावा नुकताच (दि. १८ फेब्रुवारी २०२६) वसई येथील क्रीडा मंडळ सभागृहात उत्साहात पार पडला. परिसरातील सुमारे १५० निवृत्तांपैकी १२५ जणांनी उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाची सुरुवात संघटनेचे संघटन सचिव कुमार चौधरी यांच्या प्रास्ताविकाने झाली. त्यांनी मेळाव्याचे उद्दिष्ट स्पष्ट करत उपस्थितांचे स्वागत केले. प्रारंभी बँकेच्या दिवंगत कर्मचाऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
मेळाव्यास संघटनेचे पुणेस्थित केंद्रीय पदाधिकारी सर्वश्री घोळवे, अचलेरकर, डॉ. देशपांडे, लेले, चौधरी तसेच Forum of Retired Employees चे डॉ. बारगजे उपस्थित होते. त्यांनी उद्योग पातळीवरील विविध समस्या, आरोग्य विमा, न्यायालयीन प्रकरणे, बँकेशी संबंधित प्रलंबित मुद्दे व त्यावरील उपाययोजना तसेच निवृत्तांसाठीच्या कल्याणकारी योजनांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
संघटना केवळ निवृत्त कर्मचाऱ्यांच्या हितरक्षणापुरती मर्यादित न राहता सामाजिक बांधिलकीही जपत आहे. सभासद व हितचिंतकांच्या सहकार्याने ‘सामाजिक कृतज्ञता निधी’ स्थापन करण्यात आला असून सदस्य दरवर्षी किमान एक हजार रुपये योगदान देतात. समाजातील दलित, वंचित आणि कमी विशेषाधिकार असलेल्या घटकांच्या शैक्षणिक उन्नतीसाठी कार्य करणाऱ्या संस्थांना हा निधी दिला जातो. २००५ पासून अखंड सुरू असलेल्या या उपक्रमाअंतर्गत आतापर्यंत २२३ हून अधिक संस्थांना सुमारे २.३८ कोटी रुपयांची देणगी देण्यात आली आहे. देणगीचा योग्य वापर होतो याची पडताळणीही संघटनेतर्फे केली जाते. हे योगदान आयकर कायद्यातील कलम ८०जी अंतर्गत करसवलतीस पात्र आहे.
मेळाव्यात वयाची पंचाहत्तरी पूर्ण केलेल्या १३ निवृत्त कर्मचाऱ्यांचा सन्मानपत्र, शाल व श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना किरण पाटील व रामचंद्र घरत यांनी संघटनेच्या कार्याचे कौतुक करून कृतज्ञता व्यक्त केली.
दहिसर ते डहाणू परिसरातील स्थानिक कार्यकर्ते सुनिल सलागरे, आत्माराम पाटील, रमेश राऊत, सौ. प्रिती पाटील, सौ. मंजू चौधरी, सुहास पाटील, सुरेंद्र शर्मा, मदन गडग व कुमार चौधरी यांनी महिनाभर परिश्रम घेऊन वैयक्तिक संपर्कातून मेळावा यशस्वी केला. सूत्रसंचालन सुहास पाटील यांनी केले. राष्ट्रगीत व स्नेहभोजनानंतर मेळावा संपन्न झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *