वाढवण ग्रीनफिल्ड महामार्गासाठी सरसकट १६ कोटी प्रति हेक्टरची मागणी; शेतकरी संघटना आक्रमक

पालघर जनतेचा वाली

पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदर ग्रीनफिल्ड महामार्ग प्रकल्पावरून शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. प्रति हेक्टर सरसकट १६ कोटी रुपयांचा मोबदला द्यावा, अशी ठाम मागणी जिल्हा भाजीपाला, फळे आणि फुले उत्पादक संस्थेने केली आहे.
प्रशासनाने नुकतेच जाहीर केलेल्या भूसंपादन दरानुसार अडीच ते साडेचार कोटी रुपये प्रति हेक्टर इतका मोबदला दिला जाणार आहे. मात्र हा दर बाजारभावाच्या तुलनेत अत्यल्प असल्याचा दावा शेतकरी संघटनांकडून करण्यात येत आहे. वाढवण बंदरासारख्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी जमीन दिली जात असताना विशेष पॅकेज जाहीर करावे, अशी मागणीही पुढे आली आहे.
संघटनेचे म्हणणे आहे की, मुंबई–वडोदरा द्रुतगती मार्ग आणि दिल्ली–मुंबई कॉरिडोअरप्रमाणेच या प्रकल्पासाठीही योग्य आणि न्याय्य मोबदला द्यावा. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की भूसंपादनाचे दर राष्ट्रीय नियमांनुसार निश्चित करण्यात आले असून, असमाधानी शेतकऱ्यांनी लवादाकडे दाद मागावी.
वाढवण बंदर ग्रीनफिल्ड महामार्गाच्या भूसंपादनावरून आता संघर्ष तीव्र होण्याची शक्यता आहे. प्रशासन आणि शेतकरी यांच्यातील चर्चेतून तोडगा निघणार का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *