
पालघर : प्रतिनिधी जनतेचा वाली, समाजकारण म्हणजे केवळ राजकारणाचा भाग नसून संकटात सापडलेल्या नागरिकांच्या पाठीशी उभे राहणे, ही खरी लोकसेवा असल्याचे उदाहरण नुकतेच पालघरमध्ये घडलेल्या एका दुर्दैवी घटनेतून समोर आले आहे. गुजरात राज्यातून डेस्टिनेशन वेडिंगसाठी आलेले एक कुटुंब समारंभ आटोपून परतीच्या प्रवासासाठी पालघर रेल्वे स्थानक येथे आले असताना अचानक अपघात घडला.
गाडी पकडण्याच्या घाईत एका वयोवृद्ध महिलेचा तोल जाऊन त्या गंभीर जखमी झाल्या. या घटनेमुळे रेल्वे स्थानक परिसरात एकच गोंधळ आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले. उपस्थित नागरिकांमध्ये घबराट पसरली असतानाच घटनास्थळी उपस्थित असलेले नगरसेवक चंद्रशेखर वडे यांनी कोणताही विचार न करता तात्काळ मदतीसाठी धाव घेतली.
वडे यांनी जखमी महिलेला त्वरित वैद्यकीय उपचार मिळावेत यासाठी स्वतः पुढाकार घेत त्यांना जवळच्या रिलीफ हॉस्पिटल येथे दाखल केले. डॉक्टरांनी तत्काळ उपचार सुरू केले; मात्र अतिरक्तस्रावामुळे त्या महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, उपस्थित नागरिकही या प्रसंगाने हळहळले.
घटनेच्या वेळी महिलांचे वयोवृद्ध पती त्यांच्यासोबत होते. त्यांच्या समोर घडलेली ही दुर्घटना अत्यंत वेदनादायक ठरली. अशा कठीण प्रसंगी चंद्रशेखर वडे यांनी दाखवलेली तत्परता, संवेदनशीलता आणि माणुसकीची भावना ही समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे.
चंद्रशेखर वडे हे शालेय जीवनापासूनच सामाजिक कार्यात सक्रिय असून गरजू, जखमी व संकटग्रस्त नागरिकांना मदतीचा हात देण्यासाठी ते नेहमीच पुढे असतात. जात, धर्म किंवा सामाजिक स्तराचा भेद न करता सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडविण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न समाजात वेगळे स्थान निर्माण करणारा ठरत आहे. त्यांच्या कार्यातून ‘माणुसकी हीच खरी सेवा’ हा संदेश अधोरेखित होत असल्याचे नागरिकांकडून व्यक्त केले जात आहे.
संकटाच्या काळात पुढे येऊन मदतीचा हात देणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा समाजाने गौरव व सन्मान करणे आवश्यक असल्याचे मत नागरिकांकडून व्यक्त होत असून, अशा कार्यातून समाजात सामाजिक बांधिलकी आणि मानवतेची भावना अधिक दृढ होत असल्याचेही अधोरेखित केले जात आहे.