“मी होणार महाराष्ट्र राज्याचा पोलीस!”“ खाकीचे स्वप्न… महाराष्ट्र पोलीस होण्याचा निर्धार!

पालघर जिल्हा पोलीस भरती प्रक्रिया पारदर्शकतेने सुरू; ९ हजारांहून अधिक उमेदवारांचा प्रतिसाद
पालघर :जनतेचा वाली; पालघर जिल्हा पोलीस दल तर्फे पोलीस शिपाई व चालक पोलीस शिपाई पदासाठी सुरू असलेल्या भरती प्रक्रियेला मोठा प्रतिसाद मिळत आहे. यतिश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील पोलीस भरतीची मैदानी चाचणी ११ फेब्रुवारीपासून सुरू असून ती २५ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे.
या भरती प्रक्रियेत पोलीस शिपाई पदाच्या १५८ आणि चालक पोलीस शिपाई पदाच्या ७ अशा एकूण १६५ रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात आले होते. यासाठी तब्बल ९,१०९ उमेदवारांनी अर्ज सादर केले असून त्यामध्ये ७,७६३ पुरुष आणि १,४४६ महिला उमेदवारांचा समावेश आहे.
१४ फेब्रुवारीपर्यंत झालेल्या मैदानी चाचण्यांमध्ये १,९२० उमेदवार उपस्थित राहिले. त्यापैकी १,५१३ उमेदवार पात्र ठरले असून ४०७ उमेदवार अपात्र ठरल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक राहावी यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. मैदान परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे, स्टॅटिक कॅमेरे तसेच हँडीकॅमद्वारे संपूर्ण प्रक्रियेचे चित्रिकरण करण्यात येत आहे. उमेदवारांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी मैदानावर कँटीनची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून केळी, बिस्कीट, पिण्याचे पाणी तसेच ओआरएसची सोय करण्यात आली आहे.
मैदानी चाचणीदरम्यान उमेदवारांना दुखापत झाल्यास तत्काळ उपचार मिळावेत यासाठी वैद्यकीय पथक तैनात ठेवण्यात आले असून अॅम्बुलन्सचीही व्यवस्था सज्ज ठेवण्यात आली आहे. तसेच लांबून येणाऱ्या उमेदवारांसाठी आंबामाता मंदिर (पाचबत्ती नाका, पालघर), उमरोळी ग्रामपंचायत हॉल आणि पद्मनाभ स्वामी मंदिर (टेंभोडे) येथे निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे.
दरम्यान, भरती प्रक्रियेत कोणताही गैरप्रकार सहन केला जाणार नसून, ओळखीचे आमिष दाखवून किंवा पैशाची मागणी केल्यास तात्काळ पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. भरती प्रक्रिया निपक्षपाती व पारदर्शक पद्धतीने राबविण्यात येत असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *