अजित पवार यांच्या स्मारकासाठी दोन कोटींची तरतूद करण्याची मागणी

“जनतेच्या हृदयात कायमचे स्थान… अजित दादा पवार”
पालघर जिल्ह्याच्या विकासाला गती देणारे नेतृत्व


पालघर : प्रतिनिधी जनतेचा वाली ,महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्या स्मरणार्थ पालघर येथे स्मारक उभारण्यासाठी जिल्हा परिषद अर्थसंकल्प २०२६-२७ मध्ये दोन कोटी रुपयांची तरतूद करण्यात यावी, अशी मागणी माजी उपाध्यक्ष ज्ञानेश्वर (शिवा) सिताराम सांबरे यांनी जिल्हा परिषद प्रशासनाकडे केली आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद पालघर यांना दिलेल्या निवेदनात सांबरे यांनी अजित पवार यांच्या निधनाबाबत उल्लेख करत पालघर जिल्हा परिषद स्थापनेत तसेच जिल्ह्याच्या विकासासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिल्याचे नमूद केले आहे. जिल्हा नियोजन समितीमार्फत पालघर जिल्ह्यात विविध विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून देण्यात त्यांच्या भूमिकेचा विशेष उल्लेख निवेदनात करण्यात आला आहे.
अजित पवार यांच्या कार्यामुळे जिल्ह्यातील विकास प्रक्रियेला चालना मिळाल्याचे सांगत त्यांच्या स्मृती जतन करण्यासाठी पालघर येथे स्मारक उभारणे आवश्यक असल्याचे सांबरे यांनी म्हटले आहे. त्यासाठी जिल्हा परिषद अर्थसंकल्पातील सेस निधीतून दोन कोटी रुपयांची तरतूद करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, या संदर्भातील निवेदनाची प्रत जिल्हा परिषद पालघरचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांनाही देण्यात आली आहे. प्रशासन या मागणीवर कोणता निर्णय घेणार याकडे जिल्ह्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *