
वसई पूर्व विभागासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतुदीची मागणी
महानगरपालिका आयुक्तांचे सकारात्मक आश्वासन
वसई-विरार प्रतिनिधी जनतेचा वाली: वसई-विरार महानगरपालिकेच्या पूर्व विभागातील प्रलंबित विकासकामे तसेच नागरिकांना भेडसावणाऱ्या मूलभूत सुविधांच्या प्रश्नांवर बहुजन विकास आघाडीच्या शिष्टमंडळाने महानगरपालिका प्रशासनाची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. आगामी अर्थसंकल्पात पूर्व विभागासाठी भरीव आर्थिक तरतूद करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
बहुजन विकास आघाडीचे ज्येष्ठ नेते काशिनाथ दादा पाटील, माजी आमदार राजेश पाटील आणि माजी खासदार बळीराम जाधव यांच्या नेतृत्वाखाली वसई पूर्व पट्टीतील नवनिर्वाचित नगरसेवक, नगरसेविका व पदाधिकाऱ्यांनी महानगरपालिका आयुक्त अजिवजी पाटील तसेच उपमहापौर मार्शल लोपीस यांची भेट घेतली.
बैठकीत पूर्व विभागातील झपाट्याने वाढणारी लोकसंख्या आणि त्या तुलनेत विकासकामांसाठी होत असलेली अपुरी आर्थिक तरतूद याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. प्रभाग समितीनिहाय नियोजन करून विकासकामांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी शिष्टमंडळाने केली.
या वेळी गटारे, रस्ते, पाईपलाईन, दिवाबत्ती आणि साफसफाई यांसारख्या मूलभूत सुविधांची तातडीने अंमलबजावणी करण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात आली. तसेच रस्त्यांवरील खड्डे बुजविणे, पॅचवर्कची कामे वेगाने पूर्ण करणे, प्रलंबित आकारणी प्रक्रिया सुरू करणे आणि झोपडपट्ट्या व विविध वस्त्यांमध्ये नवीन नळजोडण्या देण्याची मागणी करण्यात आली. नागरिकांना सुरक्षित व सुकर नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी दिवाबत्ती व्यवस्थाही सुधारण्याची मागणी करण्यात आली.
पूर्व विभागातील नागरिकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध व्हाव्यात आणि विकासकामांना गती मिळावी यासाठी प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा, असा आग्रह शिष्टमंडळाने धरला. यावर आयुक्त अजिवजी पाटील यांनी सर्व मागण्यांचा सकारात्मक विचार करून आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या समन्वयातून पूर्व विभागाचा नियोजनबद्ध विकास साधण्यासाठी महानगरपालिका कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या बैठकीस माजी सभापती तथा नगरसेवक कन्हैया बेटा भोईर, नगरसेवक रमेश घोरकणा, सुनील आचोळकर, सदानंद पाटील, अजित भोईर, नगरसेविका अस्मिता पाटील, सुनंदा पाटील, निशा भोईर, नगरसेवक जयंत बसवंत, अरशद चौधरी, नगरसेविका दिपा पाटील, जोशना भगली, लता कांबळे, संतूर यादव, नगरसेवक प्रसन्न भातानकर, नगरसेविका योगिता पाटील यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.