शिरगाव बीचवर शक्तीचा संग्राम; राष्ट्रीय दोरीखेच स्पर्धेचा दिमाखदार समारोप

शिरगाव बीचवर शक्तीचा संग्राम; राष्ट्रीय दोरीखेच स्पर्धेचा दिमाखदार समारोप
केरळचे वर्चस्व, विविध गटांत चुरशीची लढत; बक्षीस समारंभाला आमदार विलास तरे उपस्थित
पालघर, दि. —जनतेचा वाली
पालघर जिल्ह्यातील शिरगाव बीचवर आयोजित ३८ व्या सीनियर राष्ट्रीय दोरीखेच (टग ऑफ वॉर) अजिंक्यपद स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. महाराष्ट्र राज्य टग ऑफ वॉर फेडरेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या चार दिवसीय राष्ट्रीय स्पर्धेत देशभरातील बलाढ्य संघांनी सहभाग नोंदवत आपली ताकद, शिस्त आणि संघभावना सादर केली.
या स्पर्धेच्या समारोप व बक्षीस वितरण समारंभास बोईसरचे आमदार विलास तरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी त्यांनी पालघर जिल्ह्यात अशा दर्जेदार राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन झाल्याबद्दल आयोजकांचे कौतुक केले. “पालघर जिल्हा आता केवळ औद्योगिक केंद्र न राहता राष्ट्रीय क्रीडा नकाशावरही ठळकपणे पुढे येत आहे,” असे मत त्यांनी व्यक्त केले.
स्पर्धेदरम्यान विविध वजनगटांमध्ये अत्यंत चुरशीच्या लढती पाहायला मिळाल्या. केरळ संघाने बहुतेक गटांत सातत्यपूर्ण आणि दमदार कामगिरी करत वर्चस्व राखले. महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, आसाम, हरियाणा, पंजाब, गुजरात, चंदीगड, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश तसेच दादरा नगर हवेली व दमण-दीव आदी संघांनीही जोरदार प्रतिकार करत प्रेक्षकांची मने जिंकली.
स्पर्धेचे ठळक निकाल पुढीलप्रमाणे :
सीनियर पुरुष ६४० किलो (आउटडोअर) गटात आसाम संघाने प्रथम क्रमांक पटकावला, उत्तर प्रदेश दुसऱ्या तर केरळ तिसऱ्या क्रमांकावर राहिला; पंजाब संघ चौथ्या स्थानावर राहिला.
कॅच वेट पुरुष (आउटडोअर) गटात केरळ प्रथम, पंजाब पॉवर द्वितीय, हरियाणा तृतीय, तर पुदुच्चेरी चौथ्या क्रमांकावर राहिला.
सीनियर महिला ६×६ – ५२० किलो (आउटडोअर) गटात केरळने प्रथम क्रमांक मिळवला, महाराष्ट्र दुसऱ्या, चंदीगड तिसऱ्या, तर हिमाचल चौथ्या क्रमांकावर राहिला.
सीनियर पुरुष ६२० किलो (बीच कॅटेगरी) गटात केरळ प्रथम, दादरा नगर हवेली व दमण-दीव द्वितीय, गुजरात तृतीय, तर महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर राहिला.
सीनियर महिला ४८० किलो (बीच कॅटेगरी) गटात केरळ प्रथम, दादरा नगर हवेली व दमण-दीव द्वितीय, हरियाणा तृतीय, तर गुजरात चौथ्या क्रमांकावर राहिला.
सीनियर मिक्स ४+४ – ६०० किलो (बीच कॅटेगरी) गटात केरळ प्रथम, हरियाणा द्वितीय, छत्तीसगड तृतीय, तर महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर राहिला.
समारोप सोहळ्याला भारत टग ऑफ वॉर संघटनेचे अध्यक्ष हरीशंकर गुप्ता, भारत व महाराष्ट्र टग ऑफ वॉर संघटनेचे सचिव मदन मोहन, महाराष्ट्र राज्य टग ऑफ वॉर फेडरेशनच्या अध्यक्षा माधवी पाटील, जंगी बाबा, पालघर जिल्हा रस्सीखेच संघटनेचे अध्यक्ष सुजित पाटील, सचिव विनय सावे, उपाध्यक्ष प्रमोद पाटील, योगिता पाटील, मुनव्वर चुनेवाला, नफीस शेख, राजेंद्र राऊत, नजीब खलिफा, निरंजन पाटील, माहिर शेख, सुनील राऊत, दानिश दांडेकर, शाहिद दांडेकर यांच्यासह विविध क्रीडा संघटनांचे पदाधिकारी, पंच, प्रशिक्षक, खेळाडू आणि क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंची निवड चाचणी घेण्यात येणार असून, त्यातून निवड झालेल्या खेळाडूंना चीन येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. ही स्पर्धा केवळ विजेते-पराभूत ठरवणारी न राहता राष्ट्रीय एकात्मता, क्रीडा संस्कृती आणि युवकांच्या शक्तीचे दर्शन घडवणारा क्रीडोत्सव ठरल्याची भावना मान्यवरांनी व्यक्त केली.
चौकट :
महाराष्ट्र राज्यातून राष्ट्रीय स्तरावर टग ऑफ वॉर स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थी खेळाडूंना २५ ग्रेस गुण देण्यात यावेत तसेच नोकरीमध्ये ५ टक्के आरक्षण मिळावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य टग ऑफ वॉर फेडरेशनच्या अध्यक्षा माधवी पाटील यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *