
डिजिटल साहित्य वितरणातून ९१ शाळांना बळकटी
पालघर प्रतिनिधी जनतेचा वाली : कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार अॅड. निरंजन डावखरे यांच्या आमदार स्थानिक विकास निधीतून पालघर जिल्ह्यातील पहिल्या टप्प्यात ९१ प्राथमिक, आश्रम व माध्यमिक शाळांना डिजिटल साहित्याचे वितरण करण्यात आले. हा कार्यक्रम बुधवार (४ तारखेला) स. तु. कदम इंग्रजी माध्यम विद्यालय, पालघर येथे उत्साहात पार पडला.
शिक्षण क्षेत्रातील गुणवत्तावाढ आणि विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. या अंतर्गत विविध शाळांना डिजिटल शिक्षणासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्यात आले. या उपक्रमातून स्व. पांडुरंग नारायण कोरे विद्यालयालाही ऑल-इन-वन प्रिंटर प्रदान करण्यात आला.
या साहित्यामुळे शाळांमधील प्रशासकीय कामकाज सुलभ होण्याबरोबरच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उपक्रमांना गती मिळणार असल्याचे मत शिक्षक व पालकांकडून व्यक्त करण्यात आले. ग्रामीण व आदिवासी भागातील शाळांपर्यंत डिजिटल साधनांची उपलब्धता वाढवून शिक्षण अधिक प्रभावी करण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात येत असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
या स्तुत्य उपक्रमाबद्दल संबंधित शाळांच्या शिक्षक प्रवीण पाटील सर व व्यवस्थापनाकडून आमदार निरंजन डावखरे यांचे आभार व्यक्त करण्यात आले.