कराटेत सुवर्णझळाळी; पालघरच्या संस्कार बिरवाडकरने इतिहास रचला

कराटेत सुवर्णझळाळी; पालघरच्या संस्कार बिरवाडकरने इतिहास रचला
पालघर | प्रतिनिधी जनतेचा वाली
69 व्या नॅशनल स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने जिल्हा क्रीडा कार्यालय, पुणे यांच्या आयोजनाखाली दिनांक 31 जानेवारी रोजी बारामती पोलीस सब-हेडक्वॉर्टर येथे पार पडलेल्या राष्ट्रीय कराटे स्पर्धेत पालघर जिल्ह्याच्या संस्कार बिरवाडकर याने सुवर्णपदक पटकावत जिल्ह्याच्या क्रीडा इतिहासात मानाचा ठसा उमटवला आहे.
मसाई क्लब व नालासोपारा येथील यु. एस. स्कूल हायस्कूलचा विद्यार्थी असलेल्या संस्कारने अंडर-17 मायनस 40 किलो वजनगटात दमदार खेळ सादर करत गोल्ड मेडल मिळवले. विशेष म्हणजे, पालघर जिल्ह्यातून स्कूल गेम्सच्या माध्यमातून सुवर्णपदक जिंकणारा तो पहिलाच विद्यार्थी ठरला आहे.
या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत देशातील 29 राज्यांमधून खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. संस्कारच्या वयोगटात सुमारे 400 मुले व 400 मुली अशा एकूण 800 खेळाडूंमध्ये ही लढत रंगली होती. कठोर मेहनत, शिस्तबद्ध सराव आणि आत्मविश्वासाच्या जोरावर संस्कारने हे यश संपादन केले.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पालघर जिल्हा क्रीडा अधिकारी सुहास व्हनमाने, जिल्हा पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, जिल्हा परिषद अ‍ॅडिशनल सीईओ, जिल्हा कार्यक्रमाधिकारी हुंडेकर यांच्या उपस्थितीत तसेच तारपा वादनाची कला सातासमुद्रापार पोहोचवणारे, नुकतेच पद्मश्री पुरस्काराने सन्मानित भिकल्या लाडक्या धिंडा यांच्या हस्ते संस्कार बिरवाडकर यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रशिक्षक यश रेवडेकर व अमर भोईर यांचेही सर्व अधिकाऱ्यांनी अभिनंदन केले. कराटे खेळाचे महत्त्व अधोरेखित करत क्रीडा अधिकारी सुहास व्हनमाने यांनी, या यशामुळे भविष्यात सरकारी नोकरीत क्रीडा कोट्यातून पाच टक्के आरक्षणाचा लाभ मिळू शकतो, असेही स्पष्ट केले.
संस्कारच्या या यशामागे मसाई क्लबचे अध्यक्ष भाईदास देसले यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले. संस्कारच्या सुवर्णयशामुळे पालघर जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रात नव्या आशेची किरणे निर्माण झाली आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *