
पालघर, दि. १३ (प्रतिनिधी जनतेचा वाली )
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत जनजागृती व प्रबोधनाच्या उद्देशाने सुप्रसिद्ध अभिनेते भाऊ कदम यांनी पालघर जिल्ह्यातील हमरापूर, घोलवड व उमरोळी ग्रामपंचायतींना भेट देत ग्रामविकासाच्या नावीन्यपूर्ण उपक्रमांचा आढावा घेतला. लोकसहभाग, एकोप्याने काम आणि सातत्य यांच्या जोरावरच गावांचा सर्वांगीण विकास शक्य असल्याचा संदेश त्यांनी यावेळी दिला.
हमरापूर ग्रामपंचायतीत पाच रुपयांत वीस लिटर शुद्ध पाणी उपलब्ध करून देणाऱ्या ‘वॉटर एटीएम’ या अभिनव उपक्रमाची पाहणी करत भाऊ कदम यांनी ग्रामपंचायतीच्या पुढाकाराचे कौतुक केले. यावेळी खुल्या व्यायामशाळेचे उद्घाटन करून त्यांनी नियमित व्यायामशाळेलाही भेट दिली. सीएसआर निधीतून बांधण्यात आलेल्या रस्त्याचे उद्घाटन व वृक्षारोपण करण्यात आले. तसेच वनराई बंधाऱ्याची पाहणी करताना ग्रामस्थांनी या बंधाऱ्याला दिलेले ‘भाऊ बंधारा’ हे नाव त्यांना विशेष भावले. या बंधाऱ्यावर स्वतः श्रमदान करत त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. या बंधाऱ्यामुळे शेती उत्पादनात वाढ झाल्याचे शेतकऱ्यांनी यावेळी सांगितले. त्यानंतर त्यांनी जिल्हा परिषद शाळेला भेट देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
लोकप्रतिनिधींचा सक्रिय सहभाग आणि लोकसहभागातूनच शाश्वत ग्रामविकास साध्य होऊ शकतो. अशा नावीन्यपूर्ण उपक्रमांमुळे पालघर जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायती राज्यासाठी आदर्श ठरत असल्याचे भाऊ कदम यांनी नमूद केले.
यानंतर वाडा खडकोना येथील बंधाऱ्याची पाहणी करून त्यांनी तेथील शेतकऱ्यांशी संवाद साधला. पुढे घोलवड ग्रामपंचायतीत भेट देताना मध उत्पादन केंद्राची पाहणी करण्यात आली. शासनाने महाराष्ट्रातील तिसऱ्या क्रमांकाचे गाव म्हणून घोषित केलेल्या घोलवड येथील शुद्ध मध, बांबू उत्पादन, वारली कलेच्या वस्तू तसेच चिकूपासून तयार होणाऱ्या विविध पदार्थांचे त्यांनी विशेष कौतुक केले. ग्रामपंचायत वाचनालय आणि शाळेला भेट देत विद्यार्थ्यांशी संवाद साधताना घोलवड ही वेगळी आणि आदर्श ग्रामपंचायत असून या पंचायतीला निश्चितच पुरस्कार मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
उमरोळी ग्रामपंचायतीत आयोजित कार्यक्रमात ग्रामस्थांशी संवाद साधताना शासनाने थेट जनतेपर्यंत येऊन संवाद साधण्याची संधी दिल्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. या अभियानाच्या माध्यमातून अनेक प्रेरणादायी उपक्रम पाहायला मिळाल्याचे सांगत, असे उपक्रम आपल्या गावांमध्ये राबवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी नूतनीकरण करण्यात आलेल्या उमरोळी मासळी बाजाराचे उद्घाटन करण्यात आले.
कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणून उमरोळी येथे अभिनेते संदीप पाठक यांनी ‘वऱ्हाड निघालं लंडनला’ हे लोकप्रिय नाटक सादर केले. या नाट्यप्रयोगाला ग्रामस्थांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
तिन्ही ग्रामपंचायतींमध्ये पारंपरिक तारपा नृत्याने भाऊ कदम यांचे स्वागत करण्यात आले. त्यांनीही तारपा नृत्यात सहभागी होत ग्रामस्थांशी आपुलकीने संवाद साधला. तसेच उमेद अभियानांतर्गत महिलांनी उभारलेल्या विविध उत्पादनांच्या स्टॉल्सना भेट देत बचत गटातील महिला, अंगणवाडी सेविका व आशा कार्यकर्त्यांचे त्यांनी विशेष कौतुक केले.
या दौऱ्यावेळी आमदार राजेंद्र गावित, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र शिंदे, प्रकल्प संचालिका डॉ. रूपाली सातपुते, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) अशोक पाटील, विविध विभागांचे प्रमुख, सरपंच प्रभाकर पाटील, सरपंच रविंद्र बुजड, सरपंच अवनी सांबरे, गटविकास अधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, स्थानिक लोकप्रतिनिधी, अधिकारी-कर्मचारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

