
पालघर : प्रतिनिधी जनतेचा वाली
पालघर नगर परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेने घवघवीत यश संपादन करत थेट नगराध्यक्षपदासह १९ नगरसेवक निवडून आणले. २ डिसेंबर २०२५ रोजी झालेल्या या निवडणुकीचा निकाल २१ डिसेंबर २०२५ रोजी जाहीर झाला. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने आपल्या अनुभवी नेत्या, माजी नगराध्यक्ष तथा सलग सात वेळा लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आलेल्या डॉ. सौ. उज्ज्वला केदार काळे यांची पक्षाच्या गटनेतेपदी निवड केली आहे.
गटनेतेपदाची निवड झाल्यानंतर डॉ. काळे यांनी शिवसेनेचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, संपर्कप्रमुख रविंद्र फाटक, जिल्हाप्रमुख कुंदन संखे, नगराध्यक्ष, सर्व शिवसेनेचे नगरसेवक व पदाधिकारी यांचे आभार मानले. “पक्षाने माझ्यावर जो विश्वास टाकला आहे, त्याला कधीही तडा जाऊ देणार नाही. सर्व नगरसेवकांना विश्वासात घेऊन एकत्रितपणे काम करीन,” अशी ग्वाही त्यांनी दिली.
१९९५ पासून लोकप्रतिनिधी म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. काळे यांनी पालघरचा सर्वांगीण विकास हेच आपले प्रमुख ध्येय असल्याचे स्पष्ट केले. “विकास, विकास आणि विकास” हाच माझा अजेंडा राहील, असे त्यांनी सांगितले.
यावेळी पालघर नगर परिषदेच्या नव्या सभागृहाचे चित्रही वेगळे आहे. मागील कौन्सिलमधील केवळ आठ नगरसेवक पुनर्निवडून आले असून, एका नगरसेवकाला वगळता उर्वरित सर्व नगरसेवक प्रथमच निवडून आले आहेत. नगर परिषदेत शिवसेनेचे थेट नगराध्यक्ष व १९ नगरसेवक, भारतीय जनता पार्टीचे ८ नगरसेवक, तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ३ नगरसेवक निवडून आले आहेत.
नगर परिषदेत सत्ताधारी पक्षाचा गटनेता हा सभागृह नेता म्हणूनही काम पाहतो. त्यामुळे गटनेतेपदाची जबाबदारी डॉ. काळे कशा प्रकारे पार पाडतात, याकडे पालघरच्या जनतेसह राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.