
राज्यस्तरासाठी १३ प्रकल्पांची निवड; ५३ वे पालघर जिल्हा बालवैज्ञानिक
पालघर प्रतिनिधी :जनतेचा वाली
पालघर जिल्हा परिषद शिक्षण विभाग, पालघर जिल्हा गणित–विज्ञान अध्यापक मंडळ आणि श्री. स. तु. कदम विद्यालय, पालघर यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ५ ते ७ जानेवारी २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आलेले ५३ वे पालघर जिल्हा बालवैज्ञानिक प्रदर्शन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. ‘विकसित आणि आत्मनिर्भर भारतासाठी STEM’ या संकल्पनेअंतर्गत जिल्ह्यातील आठही तालुक्यांमधून ९४ बालवैज्ञानिकांनी आपल्या अभिनव प्रकल्पांचे सादरीकरण केले.
प्रदर्शनाचे उद्घाटन खासदार डॉ. हेमंत सवरा व आमदार राजेंद्र गावित यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी त्यांनी विविध प्रकल्पांची पाहणी करून विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. पालघर परिसरातील अनेक शाळांतील विद्यार्थी, शिक्षक व पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रदर्शनाचा लाभ घेतला.
प्रदर्शनस्थळी विद्यार्थ्यांच्या संशोधनवृत्तीबरोबरच त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी जिल्हा गणित–विज्ञान मंडळाच्या वतीने निबंध, वक्तृत्व, प्रश्नमंजुषा, चित्रकला तसेच सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमांना बालवैज्ञानिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. प्रदर्शनादरम्यान उपस्थित बालवैज्ञानिकांना निवृत्त वैज्ञानिक अधिकारी विजय ज्ञानदेव लाले यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.
समारोपप्रसंगी शिक्षण संस्था संघटना कार्याध्यक्ष चंदुलाल घरत, जीवन विकास शिक्षण संस्था अध्यक्ष वागेश कदम, कार्याध्यक्ष प्रणव कदम, जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, शिक्षणाधिकारी अशोक पाटील, प्राथमिक शिक्षणाधिकारी मातेकर, उपशिक्षणाधिकारी माधव मते, राजेंद्र पाटील, श्रीमती उषा गीते, विज्ञान मंडळ अध्यक्ष संतोष पावडे, मुंबई विज्ञान मंडळ प्रतिनिधी संदीप फणसेकर यांच्यासह अनेक मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
या प्रदर्शनातून राज्यस्तरासाठी १३ प्रकल्पांची निवड करण्यात आली आहे.
प्राथमिक विभागातून स. तु. कदम (CBSE) विद्यालय पालघर, स्वामी जे. व्ही. इंग्लिश अकॅडमी वसई, एम. बी. बी. आय. विद्यालय तलासरी (जनरल), जिल्हा परिषद शाळा मुहुंडळपाडा डहाणू (आदिवासी) आणि जिल्हा परिषद शाळा सावरोली तलासरी (दिव्यांग) यांची निवड झाली.
माध्यमिक विभागातून व. का. लाखनी माध्यमिक विद्यालय बोरीगाव तलासरी, स. तु. कदम विद्यालय पालघर, सेंट जॉन इंटरनॅशनल स्कूल पालघर (जनरल), सेवाविद्यामंदिर आदिवासी हायस्कूल गांगणगाव डहाणू (आदिवासी) आणि प्रतिभा विद्यामंदिर खानीवडे वसई (दिव्यांग) हे प्रकल्प राज्यस्तरावर जिल्ह्याचे नेतृत्व करणार आहेत.
तसेच शिक्षक निर्मित शैक्षणिक साहित्य विभागात प्राथमिक गटातून बाळासाहेब अप्पासाहेब मोरडे (जि. प. शाळा बोरांडा, विक्रमगड), माध्यमिक गटातून महेंद्र वाजेशिंग ठोके (जी. जे. वर्तक विद्यालय, वसई) आणि प्रयोगशाळा परिचर गटातून विजय जयवंत पाटील (ज्ञानदीप विद्यामंदिर, वालीव वसई) यांची निवड झाली आहे.
प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी शिक्षण विभाग, जिल्हा गणित–विज्ञान मंडळाचे कार्यकर्ते, जीवन शिक्षण संस्थेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी विशेष मेहनत घेतली. उत्कृष्ट आयोजनाबद्दल जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे व शिक्षणाधिकारी अशोक पाटील यांनी सर्वांचे अभिनंदन केले.
या प्रदर्शनासाठी संदीप फणसेकर, डॉ. राजेश मोरे, एस. पी. चौधरी, राजू पाटील, डॉ. दिनेश वाघ, डॉ. विजय धोडविंदे, निलेश पाटील आणि डॉ. धनश्री ठाकूर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
