
ग्रामीण–शहरी विद्यार्थ्यांची समान प्रगती झाली, तरच नवे शैक्षणिक धोरण
पालघर प्रतिनिधी जनतेचा वाली
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची प्रगती शहरी विद्यार्थ्यांच्या बरोबरीने झाली, तेव्हाच नवीन शैक्षणिक धोरण खऱ्या अर्थाने यशस्वी ठरेल, असे प्रतिपादन आर्यन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष केदार काळे यांनी केले. विद्याभारती कोकण–मुंबई आणि आर्यन एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने पालघर येथे आयोजित ‘शिक्षण परिषद’ उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
शुक्रवार, २ जानेवारी २०२६ रोजी पालघर येथील आर्यन एज्युकेशन सोसायटीच्या म. नी. दांडेकर हायस्कूल येथे ही एकदिवसीय शिक्षण परिषद पार पडली. या परिषदेत आर्यन एज्युकेशन सोसायटीच्या पालघर येथील तिन्ही शाळांतील शिक्षकांना विद्याभारतीचे तज्ज्ञ शिक्षक व शिक्षण क्षेत्रातील जाणकारांनी मार्गदर्शन केले.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा दृष्टिकोन, पंचकोश संकल्पना, तसेच नवीन शैक्षणिक धोरणाची वर्गपातळीवर अंमलबजावणी या विषयांवर सखोल चर्चा व मार्गदर्शन करण्यात आले. ग्रामीण व निमशहरी विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा हा प्रयत्न असल्याचे केदार काळे यांनी नमूद केले.
स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन झालेली, १२८ वर्षांची उज्ज्वल परंपरा असलेली आर्यन एज्युकेशन सोसायटी देशप्रेमी व सुसंस्कृत नागरिक घडविण्याच्या उद्देशाने कार्यरत असून, शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच ‘शिक्षण परिषद’ आयोजित करून संस्थेची शिक्षक व विद्यार्थ्यांप्रती असलेली बांधिलकी अधोरेखित होत असल्याचे त्यांनी सांगितले.
या प्रसंगी विद्याभारतीचे श्री प्रशांतजी आठवले, श्री संतोषजी भाणगे, श्री भाई उपाळे, श्रीमती भावनाताई गवळी व त्यांचे सहकारी उपस्थित होते. तसेच आर्यन एज्युकेशन सोसायटीचे कार्यवाहक श्री जयंत दांडेकर, म. नी. दांडेकर हायस्कूलचे श्री उपेंद्र घरत, इंग्रजी हायस्कूल स्कूल कमिटीचे अध्यक्ष श्री कमलेश वारया, प्राथमिक शाळेचे स्कूल कमिटी अध्यक्ष प्रा. घुगे, कार्यकारिणी सदस्य सौ. प्रज्ञा ठाकूर, मुख्याध्यापिका श्रीमती विभूती चौधरी, सौ. स्नेहल सोनार, सौ. नूतन पाटील, तसेच उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
