
पालघर, दि. 23 जनतेचा वाली :
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या अनुषंगाने पालघर जिल्ह्यात मंगळवारी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये एकाच वेळी ‘घरकुल लाभार्थी संवाद अभियान – टप्पा ३’ राबविण्यात आले. या अभियानांतर्गत पूर्ण झालेल्या घरकुलांचा गृहप्रवेश कार्यक्रम तसेच लाभार्थ्यांशी थेट संवाद साधण्यात आला. सायंकाळी चार वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार सुमारे ४,५०० घरकुलांचा गृहप्रवेश पार पडला, तर सुमारे १५,००० घरकुलांची कामे सुरू न केलेल्या लाभार्थ्यांना प्रत्यक्ष भेटी देण्यात आल्या.
जिल्हास्तरीय मुख्य कार्यक्रम मोखाडा पंचायत समिती अंतर्गत साखरी ग्रामपंचायतीत पार पडला. या कार्यक्रमास आमदार हरिश्चंद्र भोये, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांच्यासह माजी जिल्हा परिषद अध्यक्ष निकम, सरपंच, पंचायत समितीचे खातेप्रमुख, गटविकास अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) आणि प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान (पीएम-जनमन) अंतर्गत मंजूर झालेल्या घरकुल लाभार्थ्यांशी उपस्थित मान्यवरांनी संवाद साधला. लाभार्थ्यांच्या अडचणी जाणून घेऊन घरकुल बांधकाम वेळेत व दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. शासनाच्या विविध योजनांचा लाभ वेळेत घेऊन घरकुलांची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे आवाहनही करण्यात आले.
दरम्यान, महिला सक्षमीकरण उपक्रमांतर्गत जिल्ह्यात विविध ठिकाणी महिला स्वयंसहायता गट सदस्य, आशा कार्यकर्ती, अंगणवाडी सेविका व महिला बचत गट सदस्यांची हिमोग्लोबिन (एचबी) तपासणी व आरोग्य तपासणी आयोजित करण्यात आली. मोखाडा तालुक्यातील भाताने प्राथमिक आरोग्य केंद्रात हा उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात आला. महिलांच्या आरोग्याबाबत जनजागृती करणे आणि ‘अनिमिया मुक्त गाव’ ही संकल्पना बळकट करणे, हा या उपक्रमाचा उद्देश असल्याचे सांगण्यात आले.
या संपूर्ण जिल्हास्तरीय अभियानाचे नियोजन व अंमलबजावणी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र शिंदे आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालिका डॉ. रूपाली सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. त्यांच्या सूचनांनुसार पंचायत समिती व ग्रामपंचायत स्तरावर समन्वय साधून अभियान यशस्वी करण्यात आले.
