
कोकणेरमध्ये वनराई बंधाऱ्यांची उभारणी; जलसंधारणातून शेतीला बळ
पालघर, जनतेचा वाली दि. २० डिसेंबर :
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाअंतर्गत जलसंधारणाच्या माध्यमातून शेतीला बळकटी देण्यासाठी जिल्हा परिषद पालघरच्या कृषी विभागाने पालघर तालुक्यातील कोकणेर ग्रामपंचायतीत वनराई बंधाऱ्यांची यशस्वी उभारणी केली आहे. पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी अडवून त्याचा स्थानिक पातळीवर प्रभावी उपयोग व्हावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
वनराई बंधाऱ्यांमुळे पावसाचे पाणी अडवले जाऊन ते जमिनीत मुरण्यास मदत होणार असून विहिरी, बोअरवेल तसेच भूजल पातळी वाढण्यास हातभार लागणार आहे. परिणामी रब्बी व उन्हाळी हंगामातही पाण्याची उपलब्धता वाढून शेती उत्पादनात वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
या उपक्रमात जिल्हा कृषी विकास अधिकारी सोमनाथ पिंजारी, तालुका कृषी अधिकारी स्मिता पाटील यांच्यासह जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या कृषी विभागाचे अधिकारी-कर्मचारी, ग्रामपंचायत पदाधिकारी, स्थानिक शेतकरी व ग्रामस्थांनी सक्रिय सहभाग घेतला. सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, आशा वर्कर आदींच्या सहकार्यामुळे वनराई बंधाऱ्यांची उभारणी यशस्वी झाली.
वनराई बंधारे हे कमी खर्चिक, पर्यावरणपूरक आणि परिणामकारक जलसंधारणाचे साधन असून मृद्क्षय रोखण्यास व जमिनीची सुपीकता टिकविण्यास उपयुक्त ठरतात. या उपक्रमामुळे कोकणेरमधील शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत असून जिल्हा परिषद पालघरच्या शाश्वत शेती व जलसंधारण धोरणाला स्थानिक पातळीवर सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.
जिल्ह्यातील इतर ग्रामपंचायतींनीही अशा प्रकारचे वनराई बंधारे उभारून पाणी व्यवस्थापनात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.

