दहिसर ग्रामपंचायतीचा उपक्रम – सुईदोऱ्यातून स्वावलंबनाची वाट!

पालघर, जनतेचा वाली , 13 नोव्हेंबर – ग्रामीण महिलांना आर्थिक स्वावलंबनाचा हातभार लावण्यासाठी ग्रामपंचायत दहिसर (तर्फे तारापूर–वावे) आणि चेतना बहुद्देशीय संस्था, शिगांव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आरी वर्क प्रशिक्षण शिबिराला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
१५ दिवस चाललेल्या या प्रशिक्षणात एकूण २६ महिलांनी सहभाग नोंदवला. प्रशिक्षिका मेघना भोईर यांनी महिलांना आरी वर्कचे बाजारपेठेतील वाढते महत्त्व, कौशल्याधारित रोजगाराच्या संधी आणि आवश्यक साहित्याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांदरम्यान प्रशिक्षणार्थींनी कापडावर सुबक नक्षीकाम आणि मण्यांच्या सहाय्याने आकर्षक डिझाईन्स तयार करून आपली सर्जनशीलता सिध्द केली.
समारोप प्रसंगी गावच्या सरपंच अमिता धोदडे, ग्रामपंचायत अधिकारी रीना म्हात्रे, सदस्य योगिता घरत, सुवर्णा कडू, गावच्या CRP अपूर्वा घरत तसेच चेतना संस्थेच्या अध्यक्षा चेतना पाटील आणि सदस्य नीलम वरठा यांच्या हस्ते प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
या प्रसंगी संस्थेच्या अध्यक्षा चेतना पाटील यांनी सांगितले, “महिलांच्या सबलीकरणासाठी संस्था कटिबद्ध आहे. भविष्यात महिलांच्या गरजांनुसार अधिकाधिक व्यावहारिक प्रशिक्षण व कार्यशाळांचे आयोजन करण्यात येईल.”

प्रशिक्षण यशस्वीरीत्या पार पडण्यासाठी ग्रामपंचायत कर्मचारी कृतिका मॅडम तसेच संस्थेच्या समन्वयक तृप्ती मॅडम आणि सोनाली मॅडम यांचे विशेष सहकार्य लाभले.
हा उपक्रम ग्रामपंचायत दहिसरच्या महिलांसाठी स्वावलंबनाचा नवा अध्याय ठरला असून स्थानिक महिलांना रोजगाराभिमुख कौशल्य विकासाची नवी दिशा देणारा ठरला आहे.