वनराई बंधारे ‘मिशन मोड’मध्ये उभारामुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांचे जिल्हाभरात लोकसहभागाचे आवाहन

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचे प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आढावा बैठक


पालघर, दि. १६ : मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पालघर जिल्हाभरात लोकसहभागातून मोठ्या प्रमाणावर वनराई बंधारे उभारावेत, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी केले. जिल्हा परिषदेत झालेल्या आढावा बैठकीत त्यांनी या अभियानाला ‘मिशन मोड’मध्ये राबविण्याचे निर्देश दिले.
वनराई बंधारे ही केवळ औपचारिक कामगिरी न राहता प्रत्यक्ष जलसाठा निर्माण करणारी व दीर्घकालीन उपयोगाची असावीत, असे सांगत रानडे यांनी जलसंधारणाच्या माध्यमातून पाणीटंचाईवर मात करण्याचा निर्धार व्यक्त केला. यासाठी प्रत्येक विभागप्रमुखांनी पुढाकार घ्यावा, तसेच अधिकारी-कर्मचारी, महिला, स्वयंसेवी गटांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे त्यांनी स्पष्ट केले.
जलजीवन मिशन, बांधकाम विभाग, शिक्षण विभाग (सर्व शिक्षा अभियान), कालवा बांधकाम व लघुपाटबंधारे विभागांनी वनराई बंधाऱ्यांसाठी आवश्यक गोण्या व साहित्य उपलब्ध करून द्यावे, असे निर्देश देण्यात आले. जिल्हा, तालुका व ग्रामपंचायत स्तरावर समन्वय साधून बंधारे उभारण्यावर त्यांनी भर दिला.
स्वयं-सहायता समूहांच्या महिला, अंगणवाडी सेविका व आशा सेविकांनी या अभियानात सक्रिय सहभाग घ्यावा. उत्कृष्ट व उल्लेखनीय काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा योग्य सत्कार करण्यात येईल, असेही रानडे यांनी जाहीर केले.
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी वनराई बंधारे उभारणीस सर्वोच्च प्राधान्य देत विभागीय समन्वयातून परिणामकारक काम करण्याची गरज अधोरेखित केली. उपमुख्य कार्यकारी अधिकारी अशोक पाटील यांनी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, स्वयंसेवी संस्था, ग्रामस्थ व शेतकऱ्यांचा सक्रिय सहभाग आवश्यक असल्याचे सांगितले. शेतालगत असलेल्या नाल्यांवर वनराई बंधारे बांधल्यास दोन ते तीन महिने पाणी उपलब्ध राहून शेतकऱ्यांना मोठा लाभ होईल, असेही त्यांनी नमूद केले.
या बैठकीस प्रकल्प संचालक डॉ. रुपाली सातपुते, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा) इजाज अहमद शरीकमसलत, सर्व विभागप्रमुख तसेच गटविकास अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *