बोईसर ग्रामीण भागात रस्ते-पूल-संरक्षण भिंतींच्या कामांना गतीपावसाळ्यातील अडचणी दूर करण्यावर भर; आमदार विलास तरे यांच्या हस्ते भूमिपूजने

बोईसर ग्रामीण भागात रस्ते-पूल-संरक्षण भिंतींच्या कामांना गती
पावसाळ्यातील अडचणी दूर करण्यावर भर; आमदार विलास तरे यांच्या हस्ते भूमिपूजने
पालघर, प्रतिनिधी : बोईसर विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागातील दैनंदिन अडचणी दूर व्हाव्यात, या उद्देशाने विविध विकास योजनांतर्गत मंजूर झालेल्या रस्ते, पूल व संरक्षण भिंतींच्या कामांची भूमिपूजने व उद्घाटने करण्यात आली. एमएमआरडीए, प्रधानमंत्री गौण खनिज कल्याण योजना तसेच आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत ही कामे मंजूर झाली असून आमदार विलास तरे यांच्या हस्ते, शिवसेना पालघर जिल्हाप्रमुख वसंत चव्हाण यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.
मौजे खडकोली-वसरे देऊळपाडा ते डोंगरीपाडा रस्त्यावर पुलाच्या बांधकामाला मंजुरी देण्यात आली आहे. पावसाळ्यात संपर्क तुटत असल्याने ग्रामस्थांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. पलीकडे अंगणवाडी असल्याने विद्यार्थ्यांना ये-जा करताना अडचणी निर्माण होत होत्या. ही बाब लक्षात घेऊन पूल उभारणीचा निर्णय घेण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. तसेच मौजे वसरे ब्राह्मणपाडा अंतर्गत रस्त्याचे काम एमएमआरडीएच्या माध्यमातून मंजूर करून भूमिपूजन करण्यात आले.
मौजे धुकटन येथील रानोलीपाडा (कातकरी वस्ती) येथे रस्ता व संरक्षण भिंत बांधण्याचे काम प्रधानमंत्री गौण खनिज कल्याण योजनेअंतर्गत मंजूर झाले आहे. पावसाळ्यात ओढ्याचे पाणी शेतात शिरून पिकांचे नुकसान होत असल्याने ही कामे हाती घेण्यात आली. याशिवाय मौजे धुकटन दारोठीपाडा ते अतिश गोवारी यांच्या घरापर्यंत रस्ता, पाचोडे-तामसाई ग्रामपंचायत हद्दीत देऊळपाडा येथील जयवंत शेलार ते रंजना पवार यांच्या घरापर्यंत रस्ता, तसेच बहाडोली येथील समर्थनगरकडे जाणाऱ्या रस्त्याची कामे आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत मंजूर करून भूमिपूजने करण्यात आली.
या विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल ग्रामस्थांनी आमदार विलास तरे यांचे आभार मानले. कार्यक्रमास वसंत चव्हाण, शिवसेना तालुका प्रमुख नितीन सातवी, खडकोली-वसरे ग्रामपंचायत सरपंच सौ. ऋत्वि कडू, उपसरपंच भूपेंद्र नाईक, ग्रामपंचायत अधिकारी रमेश वेखंडे, माधव पाटील, धुकटन ग्रामपंचायत सरपंच प्रतिभा भोईर, उपसरपंच अपूर्वा अतुल घरत, बहाडोली ग्रामपंचायत उपसरपंच राहुल पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *