बोईसरमध्ये महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर!बारा लैंगिक अत्याचार आणि विनयभंगाच्या तक्रारींची

बोईसरमध्ये महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. गेल्या तीन महिन्यांत म्हणजेच जून ते सप्टेंबर या काळात बोईसर एमआयडीसी पोलीस ठाणे क्षेत्रात तब्बल बारा लैंगिक अत्याचार आणि विनयभंगाच्या तक्रारींची नोंद झाली आहे. यामुळे या औद्योगिक शहरात महिलांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.

बोईसर हे औद्योगिक केंद्र असल्याने येथे मोठ्या प्रमाणात परप्रांतीय कामगार राहत आहेत. भाड्याने राहणाऱ्या नागरिकांची संख्या वाढत असताना पोलीस ठाण्यातील मनुष्यबळ मात्र अत्यल्प आहे. लाखभर लोकसंख्येवर तोकडे पोलीस बळ, यामुळे कायदा व सुव्यवस्था राखणे आव्हानात्मक ठरत आहे.

अल्पवयीन मुलींसह महिलांवर विनयभंग, छेडछाड आणि बलात्कारासारखे गंभीर प्रकार वाढल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. केवळ तीन महिन्यांत तीन बलात्कार आणि नऊ विनयभंग प्रकरणांची नोंद, त्यातील बारा आरोपींपैकी अकरा आरोपींवर दोषारोपपत्र दाखल झालं आहे.

माजी पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांच्या कार्यकाळात ही सर्व प्रकरणे नोंदली गेली असून न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. मात्र या घटनांनी बोईसरमधील गुन्हेगारीचे जाळे अधिक गडद झाल्याचं स्पष्ट दिसत आहे — ड्रग्ज पेडलर, गुटखा माफिया, वेश्याव्यवसाय आणि अमली पदार्थ तस्करी यांसारख्या गुन्ह्यांनी आधीच डोके वर काढलं आहे.

या गंभीर परिस्थितीवर आमदार विलास तरे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की, “बोईसरमधील कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आणि महिलांच्या सुरक्षेसाठी मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्रव्यवहार केला जाईल.”

तर महिला नेत्री भावना विचारे यांनी स्पष्टपणे प्रश्न उपस्थित केला आहे – “आम्ही खरंच सुरक्षित आहोत का?” — कारण बोईसरमध्ये रोज महिलांवर अत्याचाराच्या पाचपेक्षा अधिक तक्रारी येत आहेत, पण गुन्हेगारांवर ठोस कारवाई होत नाही.

बोईसरच्या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आज गंभीर वळणावर आला आहे… आणि प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यास परिस्थिती आणखी बिघडू शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *