पालघर : विक्रमगड तालुक्यातील फराळपाडा येथील प्राथमिक शाळेत दिवाळी सुट्टी संपल्यानंतरही शिक्षक गैरहजर राहिल्याने विद्यार्थ्यांचा पहिला दिवस निराशाजनक ठरला आहे. सुट्टी संपल्यानंतर सोमवारी शाळा नियमित सुरू झाल्या असताना या शाळेत इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंत शिकणारे विद्यार्थी वेळेवर हजर झाले, मात्र शिक्षक मात्र आलेच नाहीत.
या प्रकारामुळे विद्यार्थ्यांना रिकाम्या वर्गात बसून परतावे लागले. ग्रामस्थांनी याबाबत तात्काळ गटविकास अधिकारी तसेच शिक्षण विभागाशी संपर्क साधून शिक्षक गैरहजर का, असा सवाल उपस्थित केला आहे. शाळा खुली असून विद्यार्थी उपस्थित असताना शिक्षक अनुपस्थित राहणे ही गंभीर बाब असल्याचे नागरिकांनी सांगितले.
दिवाळीनंतरच्या पहिल्याच दिवशी शिक्षकांनी शाळेला दांडी मारल्याने शिक्षण विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. याबाबत संबंधित शिक्षकांवर कारवाईची मागणी ग्रामस्थांनी केली असून, “शिक्षकच नसतील तर शिक्षण कसं होणार?” असा संतप्त सवाल स्थानिकांनी केला आहे.