
ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांना बळ; गावित यांच्या हस्ते कामांची सुरुवात
प्रतिनिधी जनतेचा वाली/ 11/2/2026
विविध विकास कामांचे आमदार राजेंद्र गावित यांच्या हस्ते भूमिपूजन
पालघर : आदिवासी विकास विभाग, जिल्हा नियोजन तसेच स्थानिक विकास निधी अंतर्गत पालघर मतदारसंघातील विविध विकास कामांचे भूमिपूजन आमदार राजेंद्र गावित यांच्या हस्ते पार पडले. या कामांमुळे ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा होण्यास मदत होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
यामध्ये ग्रामपंचायत ओसरविरा कोरडपाडा, देहयाळे पाटीलपाडा व कामडीपाडा, ग्रामपंचायत खानिव तसेच ग्रामपंचायत चरी पावन परिसरातील स्मशानभूमी येथे साकाव बांधकामाचा समावेश आहे. तसेच ग्रामपंचायत कासा अंतर्गत खूबरोखपाडा येथे सुमारे ८० लाख रुपयांच्या निधीतून ४०० मीटर सिमेंट काँक्रीट रस्त्याचे काम हाती घेण्यात आले आहे. याशिवाय ग्रामपंचायत तवा व वेती सातवी परिसरात रस्ते व समाजमंदिर बांधकामाची कामेही मंजूर करण्यात आली आहेत.
या कार्यक्रमाला तालुका प्रमुख संतोष देशमुख, राजकुमार गिरी, रोहित राजेंद्र गावित, सुमित गिरी, आकाश भराडे, स्थानिक सरपंच नरेश कोरडा, सुनील भोईर, सुनीता कामडी, उपसरपंच व सदस्यांसह ज्येष्ठ कार्यकर्ते काशिनाथ रसाळ, भरत डोकफोडे उपस्थित होते. तसेच सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे उपअभियंता पगारे व कासा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक नितीन डोंगरे आदी मान्यवर उपस्थित होते.
या विकासकामांमुळे ग्रामीण भागातील नागरिकांना दळणवळण व मूलभूत सुविधा अधिक सुलभ होणार असल्याची अपेक्षा स्थानिक नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

