पालघर तालुक्यात महसूल समाधान शिबिरांचे आयोजन

पालघर तालुक्यात महसूल समाधान शिबिरांचे आयोजन
पालघर : सर्वसामान्य नागरिकांची महसूलविषयक प्रलंबित कामे गावपातळीवरच निकाली काढण्यासाठी पालघर तालुका येथे तहसील कार्यालयामार्फत “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर” अभियान (टप्पा क्र. १) राबविण्यात येत आहे. प्रशासन अधिक लोकाभिमुख व पारदर्शक करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
या शिबिरांत प्रलंबित फेरफार प्रकरणांचा निपटारा, ७/१२ मधील त्रुटी दुरुस्ती, संगणकीकृत ७/१२ व ८-अ उताऱ्यांचे वितरण, उत्पन्न, रहिवासी व जात प्रमाणपत्रे देणे, अकृषीक परवानगीबाबत मार्गदर्शन, सनद प्रक्रिया माहिती, सामाजिक अर्थसहाय्य योजना मंजुरी, विद्यार्थ्यांना दाखले वाटप, ई-मोजणी अर्ज, अॅग्रीस्टॅक व पीएम किसान नोंदणी आदी सेवा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
मंडळनिहाय शिबिरे मार्च ते मेदरम्यान विविध मुख्यालयांवर आयोजित करण्यात येणार असून नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह संबंधित दिवशी उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
दरम्यान, २६ फेब्रुवारी रोजी तहसील कार्यालयात सरपंच, पोलिस पाटील व विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची पूर्वतयारी बैठक पार पडली. उपविभागीय अधिकारी श्याम मदनुरकर यांनी शिबिरांचे प्रभावी नियोजन करून नागरिकांची कामे तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *