पालघर जिल्ह्यात पर्यटन विकासावर भर; शासन–असोसिएशन संवादातून नवी दिशा

पालघर डिस्ट्रिक्ट टुरिझम डेव्हलपमेंट वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने आयोजित बैठकीत शासनाच्या पर्यटनविषयक योजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. शनिवार, ३१ जानेवारी २०२६ रोजी दुपारी २.३० वाजता भास्करवाडी येथे झालेल्या या बैठकीस पर्यटन संचालनालयाच्या उपसंचालिका प्रज्ञा मनोहर यांनी उपस्थित राहून असोसिएशनच्या सदस्यांशी संवाद साधला.
या वेळी मनोहर यांनी शासनाच्या विविध पर्यटन योजना, त्यांची अंमलबजावणी व स्थानिक पातळीवरील संधी याबाबत माहिती दिली. असोसिएशनच्या वतीने अध्यक्ष जगदीश ठाकुर व सदस्यांनी त्यांचे स्वागत करून सुरू असलेले व प्रस्तावित उपक्रम त्यांच्यासमोर मांडले. कृषी पर्यटन क्षेत्रात येणाऱ्या अडचणी, जाचक अटी व खोल्यांच्या मर्यादांबाबत सदस्यांनी मुद्देसूद मते मांडली.
त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये होणाऱ्या कुंभमेळाव्याच्या पार्श्वभूमीवर विविध राज्यांतून व परदेशातून येणाऱ्या भाविकांना पालघर जिल्ह्यातील पर्यटनस्थळांकडे कसे आकर्षित करता येईल, यासाठी शासकीय पातळीवर सहकार्याची भूमिका काय असू शकते, यावरही सखोल चर्चा झाली. कोकणातील पर्यटनाला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर पुढे नेण्यासाठी कोकणातील सर्व जिल्ह्यांतील असोसिएशन प्रतिनिधींची संयुक्त बैठक लवकरच आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
या बैठकीत पर्यटन विकासासाठी समन्वय, धोरणात्मक नियोजन व स्थानिक सहभागावर भर देण्याची गरज उपस्थितांनी अधोरेखित केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *