पालघरमध्ये संत सेवालाल महाराज जयंती उत्साहात; मोटारसायकल रॅलीने शहर दुमदुमले

पालघरमध्ये संत सेवालाल महाराज जयंती उत्साहात साजरी
पालघर : प्रतिनिधी जनतेचा वाली , बंजारा समाजाचे आराध्य दैवत असलेले संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त पालघर शहरात नवनिर्माण सेवा संस्थेच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करत जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. मोटारसायकल रॅलीसह सामाजिक व धार्मिक कार्यक्रमांमुळे शहरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले.
अठराव्या शतकातील महान संत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संत सेवालाल महाराज यांनी समाजात सदाचार, एकता, संयम आणि निसर्गप्रेमाचा संदेश दिला. अंधश्रद्धा दूर करून नैतिक व शिस्तबद्ध जीवन जगण्याचे मार्गदर्शन करत त्यांनी बंजारा समाजाला संघटित करण्याचे कार्य केले असल्याचे मान्यवरांनी सांगितले.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. त्यानंतर शहरातून मोटारसायकल रॅली काढण्यात आली. युवकांनी पारंपरिक वेशभूषेत सहभागी होत पांढरे ध्वज फडकावत उत्साहपूर्ण वातावरण निर्माण केले.
ही रॅली छत्रपती शिवाजी महाराज चौक, पालघर रेल्वे स्टेशन मार्गे वसंतराव नाईक चौक येथे पोहोचली. तेथे महानायक वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. पुढे मिरवणूक आर्यन हायस्कूल मार्गे संत सेवालाल महाराज चौक येथे दाखल झाली. येथे प्रतिमेचे विधिवत पूजन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
सदर कार्यक्रम नवनिर्माण सेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रवि भगवान राठोड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी संस्था उपाध्यक्ष राम एकनाथ चव्हाण, विठ्ठल शिवाजी राठोड, संदीप दशरथ राठोड, युवा सेना (शिवसेना शिंदे) उप शहर अध्यक्ष आकाश राजू चव्हाण, आदिवासी दलित सेना तालुका अध्यक्ष संदीप रंजीत चव्हाण, राहुल देविदास राठोड, सुरेश सुभाष राठोड, सामाजिक कार्यकर्ते गजानन शेषराव राठोड, संतोष मोतीराम शेरे, संदीप संपत राठोड, सुभाष धर्मा राठोड, करण सुदाम चव्हाण, नरेश दिनकर चव्हाण, प्रकाश राठोड यांच्यासह बंजारा बांधव आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *