
पालघरमध्ये भारत–जपान सांस्कृतिक देवाणघेवाण; जपानमध्ये भारतीय तरुणांसाठी मोठ्या संधी
पालघर : जनतेचा वालीभारत–जपान सांस्कृतिक देवाणघेवाण कार्यक्रमांतर्गत पालघर तालुक्यातील चहाडे येथील सूर्या व्हॅली स्कूल येथे ४ मार्च २०२५ रोजी विशेष संवाद सत्राचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला जपानमधील कोबे शहरातील कान्साई जपान इंडिया कल्चरल सोसायटीचे उपाध्यक्ष टोमिओ इसोगाई यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
या वेळी एओटीएस अल्युम्नी असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडियाचे अध्यक्ष प्रवीण पुरव उपस्थित होते. इसोगाई यांनी जपानी भाषा शिकणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधत जपानची संस्कृती, शिक्षण व्यवस्था तसेच भारत–जपानमधील करिअरच्या संधींबाबत मार्गदर्शन केले. जपानमध्ये विविध क्षेत्रांत दरवर्षी सुमारे ५० हजार भारतीय तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होत असल्याचे त्यांनी सांगितले.
सूर्या व्हॅली शाळेतील विद्यार्थ्यांनी सादर केलेली ‘तोतोचन’ ही जपानी नाटिका आणि जपानी भाषेवरील प्रभुत्व पाहून जपानी पाहुणे भावूक झाले. विद्यार्थ्यांसोबत त्यांनी गाणेही गायले. तसेच शाळेतील मॅथेमॅटिक्स गार्डनला भेट देत विद्यार्थ्यांचे योग कौशल्यही पाहिले. भविष्यात शाळेतील विद्यार्थ्यांना जपान दाखवण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली.
या कार्यक्रमाला प्रज्ञा शेट्टी (संचालक, राजमहेंद्र कमलाकर पाटील शिक्षण संस्था) तसेच पालघरचे माजी नगराध्यक्ष उत्तम पिंपळे यांनी विशेष उपस्थिती दर्शवली.
विद्यार्थ्यांसाठी हे सत्र प्रेरणादायी व मार्गदर्शक ठरले असून भारत–जपान मैत्री अधिक दृढ करण्यास यामुळे हातभार लागणार असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.