
पालघरच्या पाच हुतात्म्यांचा इतिहास पाठ्यपुस्तकात समाविष्ट करण्यासाठी लढा; शासनाकडून सकारात्मक प्रतिसाद
पालघर : जनतेचा वाली ,स्वातंत्र्याच्या इतिहासातील दुर्लक्षित राहिलेल्या पालघर तालुक्यातील १९४२ च्या चलेजाव आंदोलनातील पाच हुतात्म्यांचा इतिहास शालेय पाठ्यपुस्तकात समाविष्ट व्हावा, यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना सकारात्मक दिशा मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ (बालभारती) यांनी या संदर्भातील प्रस्ताव नव्या अभ्यासक्रम निर्मितीच्या वेळी समितीसमोर ठेवण्याचे आश्वासन दिले आहे.
या संदर्भात पालघरमधील १९४२ च्या चलेजाव आंदोलनातील पाच स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाचा इतिहास इयत्ता चौथी ते दहावीच्या पाठ्यपुस्तकांमध्ये समाविष्ट करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली होती. या मागणीसंदर्भात पाठविण्यात आलेले पत्र मंडळाच्या इतिहास व राज्यशास्त्र विभागाकडे प्राप्त झाले असून, नवीन अभ्यासक्रम तयार करताना या विषयाचा विचार केला जाईल, असे मंडळाच्या संचालक अनुराधा ओक यांनी पत्राद्वारे स्पष्ट केले आहे.
स्वातंत्र्य संग्रामात पालघर परिसरातील अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी ब्रिटिश सत्तेविरुद्ध लढा देत बलिदान दिले होते. मात्र या इतिहासाची व्यापक नोंद शालेय स्तरावर उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांना स्थानिक स्वातंत्र्यवीरांची माहिती मिळत नाही, अशी खंत व्यक्त केली जात होती. या पार्श्वभूमीवर स्थानिक इतिहास जतन करून विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना रुजावी, यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे.
दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालय पालघरमार्फतही या विषयासंदर्भात पाठविण्यात आलेल्या पत्राचा संदर्भ घेत संबंधित प्रस्ताव शासन स्तरावर पोहोचविण्यात आला आहे. शैक्षणिक अभ्यासक्रमात स्थानिक इतिहासाला स्थान मिळाल्यास नव्या पिढीला स्वातंत्र्य संग्रामातील योगदानाची जाणीव होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
या निर्णयाकडे पालघर जिल्ह्यातील इतिहासप्रेमी व सामाजिक कार्यकर्त्यांचे लक्ष लागले असून, लवकरच पाठ्यपुस्तकांमध्ये या हुतात्म्यांच्या कार्याचा समावेश व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
या साठी सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या विक्रम दीपक गावंडे चे सर्वत्र कौतुक होत आहे