
पालकांनी मुलांना संधी द्यावी; स्पर्धेऐवजी आत्मविश्वास घडवा – इंदूराणी जाखड
पालघर नागझरी प्रतिनिधी
“पालकांनी मुलांना प्रत्येक ठिकाणी आपली मते निर्भीडपणे मांडण्याची संधी द्यावी. इतर मुलांशी अनावश्यक तुलना किंवा स्पर्धा न करता त्यांच्या सुप्त गुणांना वाव दिला, तर याच संधींतून उद्याचे सक्षम, आत्मविश्वासी नागरिक घडतात,” असे प्रतिपादन पालघरच्या जिल्हाधिकारी इंदूराणी जाखड यांनी केले. त्या संस्कृती विद्या संकुलाच्या शालेय व महाविद्यालयीन वार्षिक स्नेहसंमेलनात बोलत होत्या.
गेल्या पाच वर्षांत संस्कृती विद्या संकुलाने शालेय व महाविद्यालयीन शिक्षणात लक्षणीय प्रगती साधली असून शैक्षणिक गुणवत्ता, सेवा-सुविधा आणि विद्यार्थ्यांची संख्या यांचा आलेख सातत्याने उंचावत असल्याचे जाखड यांनी नमूद केले. ग्रामीण भागासह तारापूर औद्योगिक क्षेत्रातील वाढत्या नागरीकरणाच्या पार्श्वभूमीवर आधुनिक शिक्षण व आरोग्यसेवा उपलब्ध करून देणारे संस्कृती महाविद्यालय पालघरच्या शैक्षणिक वैभवात मोलाची भर घालत असल्याचे त्यांनी सांगितले.
“भविष्य त्यांचेच असते, जे आजपासून तयारी करतात,” या विचाराची साक्ष देत विद्या संकुल हे शिक्षण क्षेत्रातील वटवृक्ष म्हणून उभे राहत असल्याचे चित्र या स्नेहसंमेलनातून स्पष्ट झाले.
कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या स्वागतगीताने झाली. यानंतर नृत्य, सांस्कृतिक सादरीकरणे व विविध कलाविष्कारांतून विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना व्यासपीठ मिळाले. मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग घेतल्याने हे स्नेहसंमेलन स्मरणीय ठरले.
संस्थेतील युवा पदाधिकारी, कार्यकर्ते व शिक्षकांच्या अथक परिश्रमातून आज सुमारे 2600 विद्यार्थी या विद्या संकुलात शिक्षण घेत आहेत. तालुका व जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले हे संकुल खेडोपाडी आशेचा ज्ञानदीपस्तंभ म्हणून ओळखले जाते.
संस्थेचे अध्यक्ष मनोज विनोद अधिकारी यांनी प्रस्तावनेत पालक व ग्रामस्थांचे स्वागत करून संस्थेच्या वाटचालीचा आढावा घेतला. बालवाडी–अंगणवाडीपासून थेट महाविद्यालयीन शिक्षण एकाच संकुलात उपलब्ध करून देण्याची दूरदृष्टी प्रसिद्ध उद्योजक विनोद दत्तात्रेय अधिकारी यांनी प्रत्यक्षात आणली असल्याचे दिसत आहे. शिक्षणासोबतच आरोग्य क्षेत्रात अद्ययावत रुग्णालयांची उभारणी करून ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांना सेवा देण्याबरोबरच मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती ची संधी प्रत्यक्षात उपलब्ध करून दिली आहे

पाच वर्षांच्या कालावधीत शिक्षण क्षेत्रात झालेली भरीव प्रगती, वाढती विद्यार्थीसंख्या आणि गुणवत्ताधिष्ठित उपक्रम पाहता संस्कृती विद्या संकुलातील संस्कृती महाविद्यालय पालघरच्या शैक्षणिक वैभवात मोलाची भर घालत असल्याचे या स्नेहसंमेलनातून प्रकर्षाने दिसून आले. शिक्षण, आरोग्य आणि मूल्यसंस्कारांची सांगड घालणारा हा आदर्श इतर संस्थांसाठी दिशादर्शक ठरेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.