पत्रकार कुणाल लाडे यांना ‘पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड २०२५’

मुंबई :जनतेचा वाली
महाराष्ट्र शासनाच्या आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समिती आणि व्हॉईस ऑफ मीडियाच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणारा ‘पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड २०२५’ मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे आयोजित समारंभात प्रदान करण्यात आला. सकारात्मक पत्रकारितेद्वारे समाजहिताचे विषय प्रभावीपणे मांडल्याबद्दल पत्रकार कुणाल लाडे यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमात कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोढा, आयुष्मान भारत योजनेचे ओमप्रकाश शेटे, पुढारी न्यूज वाहिनीचे संपादक प्रसन्ना जोशी, उद्योगपती व सामाजिक कार्यकर्ते राणा सूर्यवंशी, शासकीय अधिकारी महेंद्र कल्याणकर, महेश पाटील, ‘लोकशाही’चे संपादक विशाल पाटील, ‘जय महाराष्ट्र’चे संपादक प्रसाद काथे, रविकांत तुपकर, तसेच व्हॉईस ऑफ मीडियाचे संस्थापक संदीप काळे, नरेंद्र पाटील आणि पदाधिकाऱ्यांच्या हस्ते कुणाल लाडे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.
पुरस्कार स्वीकारताना कुणाल लाडे यांनी हा सन्मान आपल्या कुटुंबीय, सहकारी आणि मार्गदर्शकांना समर्पित केल्याचे सांगितले. आई महालक्ष्मीच्या आशीर्वादाने आयुष्यातील पहिला पुरस्कार मिळाल्याची भावना व्यक्त करत त्यांनी आपल्या आई-वडिलांचे, पत्नीचे, भावाचे, ग्रामस्थांचे तसेच पत्रकारितेत पाय रोवण्यासाठी मदत करणाऱ्या सर्व जिल्हा व तालुका प्रतिनिधींसह सहकाऱ्यांचे आभार मानले.
समाजहिताचे प्रश्न आणि सकारात्मक पत्रकारितेचा दृष्टिकोन कायम ठेवत पुढेही काम करत राहण्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *