
थकीत निधीमुळे जल जीवन मिशनची कामे रखडली; तातडीने वितरणाची मागणी
पालघर :जनतेचा वाली , डॉ. हेमंत विष्णू सवरा यांनी महाराष्ट्रातील महाराष्ट्र राज्यात ‘जल जीवन मिशन’ अंतर्गत प्रलंबित असलेला निधी तातडीने वितरित करण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे. यासाठी त्यांनी केंद्रीय जलशक्ती मंत्री सी.आर. पाटील यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.
खासदार डॉ. सवरा यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले की, निधी वितरणास होत असलेल्या विलंबामुळे राज्यभरातील मंजूर कामांच्या प्रगतीवर गंभीर परिणाम होत आहे. अनेक ठिकाणी कामे पूर्ण झाली असून काही प्रकल्प अंतिम टप्प्यात आहेत; मात्र केंद्र व राज्य सरकारचा निधी वेळेवर उपलब्ध न झाल्यामुळे कंत्राटदारांची देयके प्रलंबित राहिली आहेत.
कंत्राटदार संघटनांनीही आर्थिक अडचणींचा मुद्दा उपस्थित केला असून, निधीअभावी अनेक प्रकल्पांची गती मंदावल्याचे त्यांनी सांगितले आहे. यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना वेळेवर नळाद्वारे पाणीपुरवठा करण्याच्या उद्दिष्टावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
ग्रामीण भागातील प्रत्येक घरापर्यंत शुद्ध पाणी पोहोचविण्याच्या दृष्टीने ही योजना अत्यंत महत्त्वाची व कालबद्ध असल्याचे खासदार डॉ. सवरा यांनी अधोरेखित केले. त्यामुळे थकीत निधी तातडीने वितरित करून सुरू असलेली व पूर्ण झालेली कामे विनाविलंब मार्गी लावावीत, अशी मागणी त्यांनी केंद्रीय मंत्र्यांकडे केली आहे.
दरम्यान, याबाबत सकारात्मक दखल घेऊन आवश्यक निर्देश देण्याचे आश्वासन केंद्रीय मंत्र्यांकडून मिळेल, अशी अपेक्षा खासदार डॉ. सवरा यांनी व्यक्त केली आहे.