
पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड, zp C.O मनोज रानडे यांनी भिकल्या धिंडा यांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.
तारपाच्या नादातून जपलेली परंपरा : ज्येष्ठ आदिवासी तारपावादक भिकल्या धिंडा यांना पद्मश्री
पालघर, दि. २५ जानेवारी — “परंपरा आणि संस्कृती जपणं हेच माझं आयुष्य,” या साध्या पण अर्थपूर्ण शब्दांत आपल्या जीवनाचा सार सांगणाऱ्या पालघर जिल्ह्यातील वाळवंडा येथील ज्येष्ठ आदिवासी तारपावादक भिकल्या धिंडा यांना केंद्र सरकारने पद्मश्री पुरस्कार जाहीर केला आहे. या सन्मानामुळे धिंडा कुटुंबासह संपूर्ण पालघर जिल्ह्यात आनंदाचे वातावरण पसरले आहे.
९२ वर्षीय भिकल्या धिंडा यांनी अवघ्या दहाव्या वर्षापासून तारपावादनाला सुरुवात केली. सुमारे ४०० वर्षांची वंशपरंपरा लाभलेल्या या कलेला त्यांनी आयुष्यभर जपले. आदिवासी संस्कृतीचे प्रतीक असलेल्या तारपाच्या नादातून देवपूजा, सण-समारंभ, उत्सव आणि सामाजिक कार्यक्रमांतून त्यांनी आदिवासी जीवनशैलीचे दर्शन घडवले. तारपावादन हे केवळ कला न राहता त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनले.
उत्कृष्ट तारपावादक म्हणून भिकल्या धिंडा यांची ओळख राज्यासह देशभर आहे. वडिलांकडून मिळालेली कला त्यांनी तारपाची निर्मिती आणि वादन या दोन्ही पातळ्यांवर जोपासली. जवळपास दहा फूट लांबीचा तारपा वाजवणे हे त्यांचे वैशिष्ट्य मानले जाते. आजवर त्यांनी विविध ठिकाणी सादरीकरण करून रसिकांना मंत्रमुग्ध केले आहे. तसेच अनेक युवकांना तारपावादनाचे प्रशिक्षण देत ही परंपरा पुढील पिढीकडे सुपूर्द करण्याचे कार्य त्यांनी निष्ठेने केले. स्वतः तारपा तयार करून त्यावरच आपला उदरनिर्वाह चालवणं ही त्यांच्या जीवनशैलीची खास बाब आहे.
पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी भिकल्या धिंडा यांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या. “आदिवासी संस्कृतीच्या जतन व संवर्धनासाठी आयुष्य वेचणाऱ्या भिकल्या धिंडा यांचा हा सन्मान संपूर्ण पालघर जिल्ह्यासाठी गौरवाचा क्षण आहे,” असे त्यांनी नमूद केले.
आदिवासी लोककलेचा जिवंत वारसा जपत आयुष्यभर निस्वार्थ सेवा करणाऱ्या भिकल्या धिंडा यांना पद्मश्री पुरस्कार मिळाल्याने आदिवासी समाजासह सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या कार्यामुळे तारपा वाद्याला आणि आदिवासी संस्कृतीला राष्ट्रीय पातळीवर नवी ओळख मिळाल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
