
डहाणू येथे १६ मार्चला जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या पावन पादुकांचे पूजन व दर्शन
पालघर:- जनतेचा वाली प्रतिनिधी कुमार चंदन –
पालघर जिल्ह्यातील डहाणू (पश्चिम) येथील लायन्स क्लब मैदान, जालाराम बापू मंदिर परिसरात सोमवार, दि. १६ मार्च २०२६ रोजी सकाळी १० वाजता जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या पावन पादुकांचे पूजन, दर्शन, आध्यात्मिक प्रवचन तसेच सामाजिक उपक्रमांचा भव्य सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमांतर्गत दुर्बल घटकांतील शाळकरी विद्यार्थ्यांना ५० सायकलींचे वाटप करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाची सुरुवात परमपूज्य रामानंदाचार्यजी यांच्या पावन पादुकांच्या भव्य शोभायात्रेने होणार आहे. या शोभायात्रेत ढोल-ताशांचा गजर, टाळ-मृदंगाचा निनाद, वारकरी पथके, कलशधारी सुहासिनी महिला तसेच आध्यात्मिक आणि सामाजिक संदेश देणारी विविध पथके सहभागी होणार आहेत. त्यामुळे परिसरात भक्तिमय आणि उत्साही वातावरण निर्माण होण्याची अपेक्षा आहे.
यानंतर भाविकांना पावन पादुकांचे पूजन व दर्शन घेण्याची संधी मिळणार असून उपस्थितांना आध्यात्मिक प्रवचनाचा लाभही मिळणार आहे.
हा कार्यक्रम रामानंद संप्रदाय, पश्चिम पालघर जिल्ह्याच्या वतीने आयोजित करण्यात आला असून परिसरातील सर्व श्रद्धाळू व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या पवित्र धार्मिक सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.