जिल्ह्यात सिकलसेल जनजागृती सप्ताहास प्रारंभतीन वर्षांत ५ लाखांहून अधिक तपासण्या; १२,४२१ वाहक व ९७५ रुग्णांची नोंद

पालघर, दि. १४ डिसेंबर : मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यात सिकलसेल आजाराबाबत जनजागृती वाढविणे, आजाराचे लवकर निदान करून रुग्णांना वेळेवर उपचार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ११ ते १७ डिसेंबर या कालावधीत सिकलसेल जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत जिल्ह्यातील शासकीय रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रांमध्ये जनजागृती कार्यक्रमांसह तपासणी शिबिरे राबविण्यात येत आहेत.

गुरुवार, ११ डिसेंबरपासून सिकलसेल जनजागृती सप्ताहातील शिबिरांना सुरुवात झाली असून बुधवार, १७ डिसेंबरपर्यंत ही शिबिरे नियमितपणे घेतली जाणार आहेत. आरोग्य विभागामार्फत ग्रामीण व आदिवासी भागात विशेष भर देऊन तपासणी व समुपदेशन करण्यात येत आहे.

जिल्ह्यात सन २०२१ पासून आतापर्यंत एकूण ५ लाख १४ हजार ९३४ नागरिकांची सिकलसेल तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये १२ हजार ४२१ सिकलसेल वाहक तसेच ९७५ सिकलसेलग्रस्त रुग्ण आढळून आले आहेत. या सर्वांची माहिती सिकलसेल पोर्टलवर नोंदविण्यात आली असून त्यांना शासनामार्फत मोफत औषधोपचार, आवश्यकतेनुसार रक्तपुरवठा तसेच समुपदेशन सेवा दिल्या जात आहेत. पात्र रुग्णांना संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत आर्थिक सहाय्यही दिले जात आहे.

सिकलसेल हा अनुवांशिक व रक्तपेशींशी संबंधित आजार असून तो आई-वडिलांकडून अपत्यांमध्ये संक्रमित होतो. या आजारात लाल रक्तपेशी विळ्याच्या आकाराच्या व ताठर बनतात. त्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण होऊन विविध अवयवांतील रक्तपुरवठा खंडित होतो आणि रुग्णांना तीव्र वेदना सहन कराव्या लागतात. डोळे, प्लीहा, यकृत, त्वचा तसेच इतर अवयवांवर त्याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते.

सिकलसेल आजारावर संपूर्ण उपचार उपलब्ध नसला तरी योग्य वेळी तपासणी, नियमित उपचार, समतोल आहार व वैद्यकीय सल्ल्याचे पालन केल्यास आजारावर प्रभावी नियंत्रण ठेवता येते. वाहक–वाहक, वाहक–रुग्ण किंवा रुग्ण–रुग्ण यांच्यात विवाह झाल्यास अपत्य सिकलसेल वाहक किंवा रुग्ण होण्याची शक्यता अधिक असल्याने विवाहपूर्व सिकलसेल तपासणी करणे अत्यावश्यक असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.

या आजाराची प्रमुख लक्षणे म्हणजे हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होणे, हात-पाय सुजणे, भूक मंदावणे, सांधेदुखी, लवकर थकवा येणे, चेहरा निस्तेज दिसणे, लहान बालकांमध्ये वारंवार जंतुसंसर्ग होणे तसेच कावीळ येणे. अशी लक्षणे आढळल्यास तातडीने तपासणी करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

सिकलसेलग्रस्त रुग्णांना शासनामार्फत मोफत औषधोपचार, रक्तपुरवठा, समुपदेशन सेवा, संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत आर्थिक लाभ देण्यात येतो. तसेच दहावी व बारावीच्या सिकलसेलग्रस्त विद्यार्थ्यांना परीक्षेदरम्यान प्रत्येक विषयासाठी वीस मिनिटांचा अतिरिक्त वेळ देण्यात येतो, तर एस.टी. बस प्रवासात सवलतीची सुविधाही उपलब्ध आहे.

जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी सिकलसेल तपासणी करून घ्यावी आणि या जनजागृती सप्ताहात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष चौधरी यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *