
पालघरमध्ये ५३ वी जिल्हास्तरीय बालवैज्ञानिक प्रदर्शनी; १०४ शाळांचा सहभाग
पालघर | जनतेचा वाली
पालघर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक सर्जनशीलतेला व्यासपीठ देणारी ५३ वी जिल्हास्तरीय बालवैज्ञानिक प्रदर्शनी २०२५–२६ पालघर येथे आयोजित करण्यात आली आहे. शिक्षण विभाग (माध्यमिक) जिल्हा परिषद पालघर, पालघर जिल्हा गणित–विज्ञान अध्यापक मंडळ तसेच श्री. स. तु. कदम विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, बॉईसर रोड, पालघर यांच्या संयुक्त विद्यमाने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
ही जिल्हास्तरीय बालवैज्ञानिक प्रदर्शनी श्री. स. तु. कदम विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, बॉईसर रोड, पालघर येथे ५ ते ७ जानेवारी २०२६ या कालावधीत पार पडणार आहे. “विकसित आणि आत्मनिर्भर भारतासाठी STEM (STEM for Vikasit and Atmanirbhar Bharat)” या विषयांतर्गत होणाऱ्या या प्रदर्शनात पालघर जिल्ह्यातील एकूण १०४ शाळांमधील विद्यार्थी सहभागी होत आहेत.
प्रदर्शनामध्ये विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित (STEM) या क्षेत्रांशी संबंधित संशोधनात्मक, प्रयोगाधारित व नावीन्यपूर्ण प्रकल्प विद्यार्थ्यांकडून सादर करण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे, प्रयोगशीलता वाढवणे, समस्या सोडवण्याची क्षमता वृद्धिंगत करणे तसेच नवकल्पनांना चालना देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
या बालवैज्ञानिक प्रदर्शनाच्या निमित्ताने जिल्हा परिषद पालघरचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी विद्यार्थ्यांनी जिज्ञासू वृत्तीने विज्ञान व तंत्रज्ञानाकडे पाहावे, शिक्षकांनी प्रयोगाधारित व संशोधनाभिमुख शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना सातत्याने मार्गदर्शन करावे, तसेच पालक व नागरिकांनी या प्रदर्शनास भेट देऊन विद्यार्थ्यांच्या उपक्रमांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन केले आहे.
पालघर जिल्ह्यातील शालेय विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक प्रतिभेला दिशा देणारी ही प्रदर्शनी शिक्षण क्षेत्रासाठी प्रेरणादायी ठरणार असल्याचे मत शिक्षणतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.